दोन अपघातांत बीडच्या तीन ऊसतोड मजुरांचा अपघातात मृत्यू

वडवणी व केज तालुक्यांतील कुटुंबांवर शोककळा
बीड : उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामावर गेलेल्या बीड जिल्ह्यातील तीन कामगारांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या परिसरात या घटना घडल्या. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृतांमध्ये वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथील सोनाली फड आणि केज तालुक्यातील फुलचंद गायकवाड व हनुमंत रामभाऊ पालवडे यांचा समावेश आहे.
सोनाली फड यांचा कर्नाटकातील महात्मा गांधी साखर कारखान्याच्या परिसरात बैलगाडीच्या टायरखाली आल्याने मृत्यू झाला. फुलचंद गायकवाड यांचा गुरुदत्त साखर कारखान्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून खाली पडल्याने मृत्यू झाला. तर हनुमंत पालवडे यांना दौलत साखर कारखान्यावर जात असताना झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला.
घटनांची माहिती मिळताच ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शिवदास तिडके यांनी पुढाकार घेत मृत आणि जखमींना त्यांच्या गावी आणण्यास मदत केली.
पीडित कुटुंबांना मदतीसाठी पाठपुरावा
कृष्णा तिडके यांनी संबंधित साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांशी आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा सुरू केला. हनुमंत पालवडे यांचा मृतदेह गावी आणताना कुटुंबाला आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांनी सोलापूर येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करून कोणतेही पैसे न भरता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळवून देण्यात आला.
दरम्यान, घरापासून शेकडो किलोमीटर दूर कामासाठी जाणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे.






