शॉर्टसर्किटमुळे उसाला आग; साडेचार लाखांच्या नुकसानीचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चाकूर : तालुक्यातील बेलगाव येथे वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे उभ्या उसाला आग लागल्याची घटना रविवारी (दि. २५) दुपारी घडली. डीपीजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अशोकराव वाकळे पाटील आणि किशनराव वाकळे पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. या आगीत सुमारे चार लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. शेतांमध्ये अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळत असल्याच्या तक्रारी असून, रोहित्रांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबतही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

योग्य क्षमतेचे फ्यूज आणि आवश्यक सुरक्षा उपकरणे कार्यरत नसल्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो. काही ठिकाणी फ्यूजऐवजी अनधिकृत पद्धतीने तारांचा वापर केला जात असल्याचेही सांगण्यात येते. वीज यंत्रणेची नियमित तपासणी आणि देखभाल-दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आगीचे कारण शोधावे, नुकसानीचा पंचनामा करावा आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »