दुष्काळाचा साखर उद्योगाला फटका; लातूरमध्ये ऊस गाळप निम्म्यावर येण्याची भीती

लातूर : पावसाअभावी जिल्ह्यातील ऊस पिकाला मोठा फटका बसला असून, यंदाच्या हंगामात ऊस गाळपात सुमारे ५० टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून केवळ २५ ते ३० लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. उपलब्ध उसामध्ये साखरेचे प्रमाणही कमी राहण्याचा अंदाज असल्याने साखर उत्पादनावर दुहेरी परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत चांगल्या पावसामुळे उसाच्या लागवडीत वाढ झाली होती. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने उभ्या पिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही, तर काही भागांत ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे वर्षभर पीक जोपासण्यासाठी खर्च केलेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गाळप सुरू ठेवण्यासाठी पाण्याची धडपड
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असला, तरी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. काही कारखान्यांना टँकरने पाणी आणण्याची वेळ आली असून, त्यामुळे खर्च वाढला आहे. उपलब्ध उसाचे वेळेत गाळप व्हावे, यासाठी प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करण्याची गरज जागृती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी व्यक्त केली.
पाणीटंचाईमुळे यंदा इथेनॉल प्रकल्प बंद ठेवावे लागण्याची परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांनाही प्रतिटन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
चाऱ्यासाठी ऊस वापरण्याची मागणी
कमी पावसामुळे उसाची वाढ खुंटली असून, परिपक्वता नसलेला ऊस गाळपासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा उसाचा चाऱ्यासाठी वापर करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी सुभाष शिंदे यांनी केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी मांडली. ऊस उत्पादनातील घट, कमी साखर उतारा आणि वाढता खर्च यामुळे यंदाचा गाळप हंगाम शेतकरी व साखर कारखानदारांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.






