स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाचे १५ ट्रॅक्टर रोखले!

बेलापूर–कोल्हार चौकातील कारवाई; ऊस वाहतूक सुरू असल्याचा आरोप
श्रीरामपूर : ऊसदराचा प्रश्न सुटेपर्यंत साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक थांबवावी, असे जिल्हा प्रशासनाचे निर्देश असतानाही वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेलापूर येथील कोल्हार चौकात अशोक, प्रवरा आणि संजीवनी साखर कारखान्यांशी संबंधित सुमारे १५ ऊसवाहू ट्रॅक्टर रोखले.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली. प्रशासनाने आदेशांची अंमलबजावणी करावी आणि कारखान्यांनी ऊस वाहतूक थांबवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.






