अहिल्यानगरची ऊस दर बैठक एक दिवस पुढे ढकलली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर | शुगरटुडे

अहिल्यानगर जिल्ह्यातील गाळप ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी नियोजित करण्यात आलेली साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आता एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून ती शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत ऊसदराबाबत साखर कारखान्यांचे अध्यक्ष कोणती भूमिका मांडणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ऊसदराच्या प्रश्नावर यापूर्वी चार बैठका होऊनही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने शुक्रवारची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पालकमंत्री विखे यांच्या सूचनेनुसार बैठकीचे वेळापत्रक बदलण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक गणेश पुरी यांनी संबंधितांना पत्राद्वारे दिली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू असलेली ऊसतोडणी व ऊसवाहतूक बंदी आणखी एक दिवस कायम ठेवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश टाके यांनी केली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी ऊसदर जाहीर करावा आणि प्रतिटन ४ हजार रुपयांचा दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जिल्हा बँकेकडून कारखान्यांना प्रति क्विंटल देण्यात येणारी उचल जाहीर झाल्यानंतर ऊसदराचा प्रश्न आता कारखानदारांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत साखर कारखानदार कोणती भूमिका घेतात, यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »