दुष्काळात वाळणारा अपरिपक्व ऊस शासनाने खरेदी करावा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

औसा : दुष्काळामुळे शेतात वाळत असलेला अपरिपक्व ऊस शासनाने योग्य मोबदला देऊन खरेदी करावा, तसेच चारा लागवड योजनेतील आर्थिक तरतूद पूर्ववत करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. त्यांच्या मागण्यांची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागांना अभ्यास करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत पवार यांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती मांडली. पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांचा ऊस सात ते आठ महिन्यांचा झाला आहे. हा अपरिपक्व ऊस साखर कारखान्यांकडून गाळपासाठी स्वीकारला जाण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा उसाचे सर्वेक्षण करून त्याची वजनानुसार खरेदी करावी आणि त्यापासून चारा तयार करून जनावरांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

चारा लागवड योजनेतील तरतूद कमी केल्याने शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार असल्याचेही पवार यांनी निदर्शनास आणले. मूळ योजनेत चारापिकांसाठी प्रतिहेक्टर २ लाख २३ हजार रुपयांची तरतूद होती; मात्र नव्या शासन निर्णयानुसार ती ५० हजार रुपये करण्यात आली आहे. ही तरतूद अपुरी असल्याने ती पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच १० गुंठे ते एक एकर क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा, असे त्यांनी सुचवले.

या मागण्यांवर पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला भारत गोगावले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »