ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी : पांडुरंग राऊत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे । शुगरटुडे

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा ऊस गळीत हंगाम सुरू झालेला आहे. दरवर्षी उस तोडणी वाहतूक मजूर कुटुंबासहित कारखाना परिसरात येत असतात. या स्थलांतरित झालेले ऊस तोडणी बंधु – भगिनी यांची कारखान्यामार्फत हंगाम कालावधीमध्ये आरोग्य तपासणी केली जाते. चालू हंगामामध्ये १८ नोव्हेंबर २०२६ रोजी कारखान्यावर प्रत्यक्ष कोपी यार्डात ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,दौंड व प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू, यांचे मार्फत मोफत दुसरे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याची आमच्या कारखान्यातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत यांनी दिली.

ऊस तोडणी मजुरांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीमध्ये बी.पी., रक्तातील साखर, इ. तपासणी करण्यात आल्या. तसेच कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मार्फत मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य विषयक तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर प्रामुख्याने गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरोदरपणात घ्यावयाच्या काळजी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरचा लाभ एकूण ७३ ऊस तोडणी वाहतूक बंधू-भगिनींनी घेतला आहे.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, राहू चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित रोकडे यांनी सर्व उपस्थितांना आपले आरोग्य चांगले ठेवणे याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये आहारामध्ये पालेभाजा जास्त खाणे, मिठाचा व तेलाचा वापर कमी करणे. लहान मुलांना आहारमध्ये दूध, अंडी यांचा समावेश करणे. याबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दौंड येथील डॉ. प्रज्ञा गायकवाड (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ. मयुरेश कांबळे (समुदाय आरोग्य अधिकारी), सरोज चोरमले (एएनएम), नेहा पराटे (फर्मासिस्ट) यांनी उपस्थित राहून ० ते १८ वयोगटातील मुलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली.

तसेच डॉ. नेहा ताठे (समुदाय आरोग्य अधिकारी), सौ. पुजा सावके (आरोग्य सहायिका), राहुल चोकलिंगम, योगेश पोटे (आरोग्य निरीक्षक), श्री. प्रसाद माकर (आरोग्य सेवक), श्री. आकाश कदम (आरोग्य सेवक), श्री. आकाश आबणे (आरोग्य सेवक), सौ. कावेरी कुंभार, सौ. प्रमोदिनी कदम व वैशाली देवकर (आशा स्वयंसेविका) तसेच कारखान्याचे डॉ. प्रविण गजरे यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले.

ऊस तोडणी मजुरांचे आरोग्य चांगले रहावे या करीता कारखान्यावर आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. यापूर्वीही दि. ०४/११/२०२६ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन कारखान्यामार्फत केलेले आहे. तसेच ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लहान मुलांना दि.२२/११/२०२६ रोजी पोलिओचा डोसही देण्यात आला आहे.

या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत मार्गदर्शन करताना म्हणाले की, ऊस तोडणी बांधवांचे आरोग्य चांगले रहावे या करिता व्यवस्थापन सर्वोतोपरी काळजी घेत आहे. ऊस तोडणी मजुरांना सर्व सोयी-सुविधा कारखाना उपलब्ध करून देत आहे. हंगाम कालावधीमध्ये वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मजुरांना पिण्यासाठी फिल्टर पाणी, शौचालय सुविधा, महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन, साखरशाळा, पाळणाघर, लाईट व्यवस्था, बैलांसाठी लसीकरण, पाणी पिण्यासाठी पाण्याचे हाळ, शेततळे, सभामंडप, कारखाना साईटवर निवासी डॉक्टर व दवाखाना, माणुसकीची भिंत, कारखान्यावर वास्तव्यास असलेल्या मुलांना आहार चांगला मिळावा या करिता जिल्हा परिषद मार्फत साखरशाळेतील मुलांना पोषण आहार इ, सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत.

मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या प्रसंगी कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास (अण्णा) रासकर, सह कार्यकारी संचालक माधव राऊत, संचालक किसन शिंदे, भगवान मेमाणे, लक्ष्मण कदम, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन. यादव, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी ए. बी. शेंडगे तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कंत्राटदार व ऊस तोडणी बांधव उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »