कृषी अवशेषापासून बायोबिटूमेन, सीबीजी उत्पादन करा : नितीन गडकरी

“अन्नदाता ते ऊर्जादाता” राष्ट्रीय परिषदेस उदंड प्रतिसाद
नागपूर | शुगरटुडे
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) च्या वतीने रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अन्नदाता ते ऊर्जादाता: विकसित भारतासाठी बायोगॅस आणि सीबीजी (CBG) विस्तारीकरण’ या राष्ट्रीय परिषदेस अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या परिषदेत विदर्भ, महाराष्ट्र व देशाच्या विविध भागांतून ३०० हून अधिक प्रतिनिधी, धोरणकर्ते, सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, प्रकल्प विकासक, शास्त्रज्ञ व शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन:
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाले की, कृषी अवशेष, कापूस पऱ्हाटी, तुरीच्या काड्या व सेंद्रिय कचऱ्यापासून बायो-सीएनजी (CBG) आणि बायो-बिटुमेन निर्मिती केल्यास बळीराजा खऱ्या अर्थाने ‘अन्नदाता’ सोबतच ‘ऊर्जादाता’ बनेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन इंधन आयातीवरील खर्च कमी होईल.

* बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य): महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता बायोगॅस व हरित ऊर्जा निर्मितीकडे वळावे, यासाठी राज्य शासन आवश्यक धोरणात्मक व आर्थिक पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
* इतर मान्यवर व तांत्रिक सत्रे: याप्रसंगी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल खराटे, महाजनको व महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक आणि IFGE चे संस्थापक संचालक श्री. वैभव डांगे यांनी मार्गदर्शन केले. दिवसभरातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये सीबीजी प्रकल्प उभारणी, केंद्र शासनाचे अनुदान, बँक वित्तपुरवठा व ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे खरेदी करार (Offtake) यावर सखोल मंथन झाले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथाचे प्रकाशन:
याच सोहळ्यात साखर आयुक्तालय पुणे, IFGE पश्चिम विभाग आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या “नॅशनल कॉन्फरन्स प्रोसिडिंग्ज २०२६: कंडेन्सेट वॉटर रिकव्हरी, ईटीपी रियूज अँड वॉटर सिक्युरिटी इन शुगर फॅक्टरीज अँड द इथेनॉल इंडस्ट्री” या ग्रंथाचे प्रकाशन मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते व सीओईपीचे कुलगुरू, मेकॅनिकल व कॉम्प्युटर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
परिषदेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन IFGE चे प्रादेशिक संचालक (पश्चिम विभाग) दिलीप पाटील यांनी केले, तर नागपूर येथील स्थानिक समन्वयासाठी डॉ. समय बनसोड यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रायोजक व स्थानिक सहकार्य:
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्लॅटिनम प्रायोजक (सुप्रभ हायजिनिक, कॅनएक्स ग्रुप, राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टम्स प्रा. लि., एसएनसीई), गोल्ड प्रायोजक (एम एम एन्व्हायरो प्रोजेक्ट्स प्रा. लि., स्मार्ट टेकलॉग एलएलपी, थर्मो फिशर सायंटिफिक इंडिया प्रा. लि., सीएडी मार्केटिंग), सिल्व्हर प्रायोजक (ट्रायो तत्त्व वेस्ट मॅनेजमेंट, सस्ब्दे लोक नागपूर प्रा. लि., एचसीजी नागपूर प्रा. लि.) व लॅनयार्ड प्रायोजक (सन्मिश क्लीन एनर्जी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






