दुष्काळी भागातील ऊसतोडणीसाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा

अंबड : अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील काही भागांत कालव्याचे पाणी सोडण्यात आले असले, तरी अनेक गावांमध्ये अद्याप तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याअभावी ऊसपीक वाळण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागातील ऊसाला तोडणीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांकडे केली आहे.
कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कालव्यांपासून दूर असलेल्या गावांमध्ये ऊसपीक जगवणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आणि कष्टाने पीक वाढवले; परंतु पाणी नसल्याने ते हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
दुष्काळी भागातील ऊस वाळण्यापूर्वी त्याची तोडणी करून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. रामकिसन जाधव यांच्यासह ऊस उत्पादकांनी केली आहे. कारखान्यांनी तोडणीचे नियोजन करताना केवळ कालव्यालगतच्या ऊसाला प्राधान्य न देता पाणीटंचाई असलेल्या भागातील शेतकऱ्यांचाही विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






