‘ऊस उत्पादकांनो, वजनाची खात्री खासगी काट्यावर करा’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : यंदाच्या ऊसदराचा तिढा लवकर सुटून तीन टप्प्यांत प्रतिटन एकूण ४,२०० रुपये दर निश्चित झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कारखान्यांच्या वजनकाट्यांवर वजनात गडबड होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून घ्यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर यंदाचा दर निश्चित झाला. खत, मजुरी आणि मशागतीचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनखर्चापेक्षा अधिक दर मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरासाठी दरवर्षी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता वजनाच्या बाबतीतही सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी संघटनेने तालुक्यातील प्रमुख ठिकाणी फलक लावले आहेत.

खासगी वजनकाट्यावर ऊसाचे वजन केल्यास कारखान्याच्या काट्यावरील वजनाशी तफावत आहे का, हे तपासता येईल आणि संभाव्य फसवणूक टाळण्यास मदत होईल, असे संघटनेने म्हटले आहे. शेतकरी हितासाठी वजनकाट्यांच्या बाबतीत कारखान्यांनी सहकार्य करावे, असे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी सांगितले. खासगी वजनकाट्यांवर ऊसाचे वजन करण्यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्याची तयारी संघटना करत आहे.

गेल्या वर्षी ऊसदरासाठी विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे १५ कोटी रुपयांचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »