साखर विक्री कोट्याचे उल्लंघन केल्यास कारखान्यांवर कारवाई

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : देशांतर्गत साखर विक्रीसाठी ठरवून दिलेल्या मासिक कोट्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साखर विकल्यास अतिरिक्त विक्रीचे प्रमाण पुढील महिन्याच्या कोट्यातून वजा केले जाणार आहे. याबाबत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

साखर विक्रीच्या आकडेवारीची तपासणी करताना काही कारखान्यांकडून कोट्यापेक्षा जास्त विक्री होत असल्याचे आढळले. त्यामुळे अतिरिक्त विक्रीचे प्रमाण पुढील महिन्याच्या कोट्यात समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त पथके कारखान्यांची प्रत्यक्ष तपासणी करतील. नियमभंग आढळल्यास आवश्यकतेनुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई होऊ शकते.

वर्षभरात तीन वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांना निर्यात कोटा आणि प्रोत्साहन योजनांचे लाभ मिळणार नाहीत. वारंवार नियमभंग करणाऱ्यांना अतिरिक्त कोटा न देण्याबरोबरच, गाळप परवाना रोखणे किंवा ऊस क्षेत्र कमी करण्यासारख्या कारवाईची शिफारसही राज्य सरकारकडे केली जाऊ शकते.

मंजूर कोट्याच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी साखर विक्री करणाऱ्या कारखान्यांनी २० तारखेपर्यंत पूर्वसूचना न दिल्यास त्यांचा पुढील महिन्याचा कोटा कमी होऊ शकतो. तसेच, विक्री केलेली साखर सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वतःच्या गोदामात ठेवून अतिरिक्त कोट्याची मागणी केल्यास त्यावर विचार केला जाणार नाही.

व्यापारी, एजंट आणि ग्राहकांशी संबंधित व्यवहारांची माहिती तसेच गोदामातील साखरेचा तपशील देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे साखर विक्री, साठा आणि कोटा व्यवस्थापनावर केंद्राचे नियंत्रण अधिक कडक होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »