ऊसदरावरून जिल्ह्यांमध्ये कोंडी; आंदोलनाचा इशारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर, सांगली, सातारा आणि अहिल्यानगरमध्ये दराबाबत अनिश्चितता

पुणे : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी सोलापूर, सांगली, सातारा आणि अहिल्यानगर या ऊस उत्पादक जिल्ह्यांसह मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कारखानदारांनी जाहीर केलेले दर आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या यांत मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन ३,१०० रुपये पहिली उचल आणि पुढील टप्प्यात आणखी ३०० रुपये देण्याच्या सूत्रावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील शेतकरीही याच धर्तीवर दर देण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दराबाबतची कोंडी कायम आहे. परभणी जिल्ह्यातील एका कारखान्याने गाळप हंगाम सुरू करताना प्रतिटन ३,१०० रुपये पहिली उचल जाहीर केली; मात्र शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर अपेक्षित आहे.

सोलापुरात अनेक कारखान्यांचे दर जाहीर नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांनी प्रतिटन ३,१५० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे २४ कारखान्यांनी अद्याप दर जाहीर न केल्याने कोंडी कायम आहे. शेतकरी संघटनांनी प्रतिटन ३,५०० ते ३,६०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तोडगा न निघाल्यास १६ नोव्हेंबरला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. ऊसतोड बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अहिल्यानगरमध्ये ३,५०० रुपयांचा प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांचा दर अद्याप निश्चित झालेला नाही. शेतकरी संघटनांनी प्रतिटन सुमारे ४,००० रुपये दराची मागणी केली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारांनी किमान ३,५०० रुपये प्रतिटन दर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती. मात्र, बैठकीत दराबाबत तोडगा निघाला नाही.

सांगलीत ४,२०० रुपयांची मागणी

सांगली जिल्ह्यातील कारखानदारांकडून अद्याप एकमताने दर जाहीर करण्यात आलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या धर्तीवर ३,१०० रुपये पहिली उचल, हंगाम संपताना आणखी १०० रुपये आणि पुढील हंगामापूर्वी २०० रुपये, अशी एकूण ४,२०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी कारखानदारांकडून प्रतिटन ३,६०० ते ३,६५० रुपयांच्या पहिल्या उचलीचा प्रस्ताव आल्याचे वृत्त आहे.

साताऱ्यात साखर उताऱ्यावरून दराचा पेच

सातारा जिल्ह्यातही दर निश्चित झालेला नाही. साखरेच्या उताऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन दर ठरवावा, अशी कारखानदारांची भूमिका आहे.

कोल्हापुरात साखरेचा उतारा १३.६० टक्क्यांपर्यंत, तर साताऱ्यात तो ११ ते १२.६० टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिकव्हरीनुसार दोन विभाग करून दर निश्चित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

दराचा प्रश्न न सुटल्यास आंदोलनाची शक्यताऊसदराचा तिढा कायम राहिल्यास ऊसतोडणी, वाहतूक आणि गाळपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च, साखरेचे बाजारभाव आणि साखरेचा उतारा यांचा विचार करून कारखानदारांनी दर जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे, कोल्हापूरप्रमाणे दर मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दराचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »