तब्बल ७० कांड्यांचा ऊस ठरतोय आकर्षण!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आंबेगाव, जि. पुणे : प्रतिनिधी जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास लबडे यांच्या शेतातील आडसाली उसाने परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या शेतात सध्या ऊसतोड सुरू असून, २६५ जातीच्या उसाला तब्बल ७० कांड्या आल्याने या उसाची चर्चा होत आहे.

लबडे यांनी शेतात २६५ जातीच्या आडसाली उसाची लागवड केली. योग्य मशागत, संतुलित खतांचा वापर, अनुकूल वातावरण आणि वेळेवर पाणीपुरवठा यामुळे पिकाची वाढ चांगली झाली. सध्या उसाची तोड सुरू असून, त्याचे गाळपही चांगल्या पद्धतीने होत आहे.

भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे यांनी सांगितले की, एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो, तसेच खोडवा उसासाठी अनुदानही दिले जाते. लबडे यांच्या शेतातील ऊस ७० कांड्यांपर्यंत वाढला असून, त्यांच्या मेहनतीचे हे फलित आहे.योग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून ऊस उत्पादन वाढवता येते, याचे उदाहरण लबडे यांच्या शेतातून पाहायला मिळत असल्याचे ऊस उत्पादक प्रवीण लबडे यांनी सांगितले. जारकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्येही या पिकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »