आता कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करा : जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ४) शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. गुरुवारपासून साखर कारखान्यांचे गाळप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी प्रतिटन ३,६५० रुपये दर देण्याची मागणी केली. योग्य दर मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका काही शेतकरी संघटनांनी घेतली होती. जाहीर केलेला ३,६०० रुपयांचा दर काही शेतकऱ्यांना मान्य असला, तरी काहींनी त्याला विरोध दर्शवला.
शेतकऱ्यांच्या मागणीवर चर्चा झाल्यानंतर मंत्र्यांनी ३,६०० रुपये दर जाहीर केला. मात्र, त्यात प्रतिटन ५० रुपयांची वाढ करून ३,६५० रुपये द्यावेत आणि त्यानुसार कारखान्यांनी गाळप सुरू करावे, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी कायम ठेवली. त्यामुळे कारखाने सुरू होणार का आणि दराचा तिढा कसा सुटणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






