किणी टोल नाक्यावर *स्वाभिमानी*चा ‘चक्का जाम’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर । शुगरटुडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळण्याच्या मागणीसाठी किणी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’ झाला असून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्हा आणि बेळगाव सीमाभागातूनही शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. राजू शेट्टी यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी रस्त्यावरच झोपून रात्र काढली.

* स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला **प्रतिटन ४,५०० रुपये** पहिली उचल मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. दिवसभर आंदोलन सुरू असतानाही सायंकाळपर्यंत प्रशासन किंवा साखर कारखानादारांचा कोणताही प्रतिनिधी चर्चेसाठी आंदोलनस्थळी आला नाही.

चर्चेसाठी कोणीही न आल्याने आंदोलनाची कोंडी कायम राहिली. यावर आक्रमक होत एका शेतकऱ्याने “वेळ पडली तर तळ ठोकू, पण बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा दिला.

* स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यासमवेत माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी पाटील, विक्रम पाटील, राजू कुंभार, राजेंद्र गड्डूयानावर, धनाजी पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनस्थळी ठिय्या मांडून होते.

* आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून २० अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या असा सुमारे **४०० हून अधिक जणांचा कडक पोलीस बंदोबस्त** किणी टोल नाका परिसरात तैनात करण्यात आला होता.

आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांकडून अडवले जात असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. ही माहिती मिळताच राजू शेट्टी यांनी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांची अडवणूक तात्काळ थांबवण्याची विनंती केली. अडवणूक न थांबवल्यास पंचगंगा पुलाकडे कूच करू, असा थेट इशारा शेट्टी यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांची अडवणूक थांबवली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »