पृथ्वीपल्याड त्रिनिदाद आणि टोबॅगो देशामध्ये रुजली भारतीयांची पाळेमुळे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, माजी एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक मंगेश तिटकारे लिहीत आहेत “शर्करायन” या वाचकप्रिय सदरातून. या सदरात ते लिहीत आहेत, साखर उद्योगाचा मानवी स्थलांतरावरील प्रभाव… भारताच्या संदर्भाने ही मालिका असेल, ती नक्कीच सर्वांना आवडेल.
(भाग ६)

  • संपादक
Trinidad Map

१४९८ साली कोलंबसने त्रिनिदाद – टोबॅगोच्या किनार्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी तिथे अरावाक आणि कॅरिब इंडियन लोकवस्ती होती. या लोकवस्तीचा स्पॅनिश लोकांनी मोठ्या प्रमाणात नायनाट केला. त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आणि संरक्षणाच्या बदल्यात स्पॅनिश मिशनच्या जमिनीवर गुलाम म्हणून काम करण्यासाठी दबाव टाकला जात असे.

Trinidad Tobago Sugar Industry workers
Trinidad Tobago Sugar woman workers

१७०० सालापर्यंत त्रिनिदाद एक विरळ लोकवस्तीचे जंगली बेट होते. स्पॅनिश राजाने १७८३ सालामध्ये स्पॅनिश राजघराण्याशी निष्ठेची शपथ घेण्याच्या बदल्यात कुठल्याही परदेशी वसाहतवाल्यांना आणि त्यांच्या गुलामांना येथे मोफत जमिनी दिल्या. परिणामी अनेक मार्टिनिक क्रिओल मळेवाले त्रिनिदादमध्ये स्थायिक झाले. या फ्रेंच मळेवाले आणि मोफत जमिनीच्या आमिषाने आकर्षित झालेल्या इतर युरोपियन लोकांनी त्रिनिदादमध्ये अत्यंत फायदेशीर ऊस आणि कोको उद्योग विकसित केला.

१७ व्या शतकात बेटावर जबरदस्तीने आणलेले आफ्रिकन गुलाम बेटावरील साखर आणि कोकोच्या मळ्यांमधील बहुसंख्य कामगार होते. १८३८ सालाच्या संसदेच्या कायद्याने सर्व ब्रिटिश प्रदेशातून गुलामीगिरी रद्द केल्याने गुलामीगिरीतून मुक्त झालेल्या आफ्रिकन लोकांनी येथील साखरेच्या आणि कोकोच्या मळ्यांमध्ये पुढे काम करण्यास नकार दिला आणि मोठ्या संख्येने शेती सोडून निघून गेले.


त्यानंतर इंग्रज मळेवाल्यांनी चिनी, पोर्तुगीज, आफ्रिकन अमेरिकन आणि विशेषतः भारतीय कराराबद्ध मजूर म्हणून येथे आणण्यात आले. या नवीन लोकसंख्येने बेटांच्या सांस्कृतिक उत्क्रांतीत परिवर्तन व बदल घडवून आणले. भारतीय लोक हे सर्वांत लवचिक, मेहनती, स्थिर आणि तत्पर कामगार ठरले. त्यामुळे त्यांची जास्त भरती करण्यात आली. येथे आलेले भारतीय पूर्णपणे शेतकरी वर्गातून आलेले काटक लोक होते. ते मुख्यतः भारताच्या बिहार, उत्तर प्रदेशातून आले होते. याशिवाय मद्रास, गुजरात, पंजाब, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र या प्रांतांतूनही लोक येथे आले होते.

३० मे १८४५ रोजी भारतीय ‘फटेल रझाक’ नावाच्या जहाजातून पहिल्यांदा येथे आले. त्याच्या स्मरणार्थ ३० मे हा दिवस ‘इंडियन अरायव्हल डे’ (Indian Arrival Day) म्हणून १९९० च्या दशकापासून येथे साजरा केला जातो.

उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी तत्कालीन हिंदुस्तानातून १८ व्या शतकात पृथ्वीपल्याड, सातासमुद्रापार द. अमेरिकेत कराराने आणल्या गेलेल्या हिंदुस्तानी लोकांची पिढी मोठ्या कष्टाने, प्रामाणिकपणे येथील उसाच्या मळ्यात, साखर उत्पादन करण्यासाठी येथे राबली आहे.

१५०-१७५ वर्षे पिढ्यानंपिढ्या येथील स्थानिक संस्कृतीशी, आफ्रिकेतून, चीनमधून इतर देशांतून आणलेल्या लोकांशी जुळवून घेऊन, मेळ साधून आपल्या संस्कृतीची, भाषेची नाळ, इथे घट्ट रुजवली आहे. उसाची शेती, साखरेचे उत्पादन यामुळे निर्माण झालेली संस्कृती आहे हे विसरता येणार नाही.

Datta Mandir in Trinidad and Tobago

Hanuman Statue in Trinidad and Tobago
Basdev Pande

बसदेव पांडे
वकील, कामगार नेते, अर्थशास्त्रज्ञ, अभिनेते, राजकारणी, माजी सनदी अधिकारी असलेले बसदेव पांडे ही या देशाची १९९५-२००१ काळातील पाचवे पंतप्रधान व इंडो-त्रिनिदादीयन वंशाचे पहिले हिंदू पंतप्रधान होते. त्यांनी भारतीय वंशाच्या बहुसंख्य मतदार असलेल्या युनायटेड नॅशनल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २ जानेवारी २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व इतर नातेवाईकांनी भारतात येऊन बिहारमधील निजामाबाद (जि. आझमगड) तालुक्यातील लखनपूर या गावी त्यांची तेरावी वगैरे धार्मिक विधी केले.


त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील
भारतीय चटणी सोका संगीत

Drupatee Ramgoonai
द्रुपती रामगुणाए

त्रिनिदाद आणि टोबॅगो, आणि दक्षिण अमेरिकेतील इतर देश गयाना आणि सुरिनाममध्ये चटणी-सोका संगीत ही एक त्रिनिदादीयन-क्रॉसओव्हर संगीत शैली आहे, जी सोका आणि कॅलिप्सो यांना चटणी संगीताबरोबर मिसळते. ही शैली इंडो-त्रिनिदादीयन संस्कृतीत रुजलेली आहे.

इंडो-त्रिनिदादीयन लोकांनी पृथ्वीपल्याड परक्या या देशात सुंदर आपली पाळेमुळे रुजवताना आपल्या देशी लोककला आणि संगीताचा येथील भाषा आणि चालीरीती यांचा संगम घडवून आणि एक संमिश्र लोकप्रिय कलाप्रकार कसा तयार केला आहे त्याचे चटणी-सोका हे एक उत्तम उदाहरण आहे. या फ्यूजनची सुरुवात मुळात १९६० आणि १९७० च्या दशकात लॉर्ड शार्टी यांनी केली होती. यात इंग्रजी, हिंदुस्तानी आणि इंग्लीश गीतांचा समावेश असतो, तसेच गिटार, पियानो, ड्रम सेट यासारखी पाश्चात्य वाद्ये आणि ढोलक, हार्मोनिअम, तबला, बुलबुल तरंग व घनताल यासारखी भारतीय वाद्ये वापरली जातात.

चटणी-सोका ही संज्ञा १९८७ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या द्रुपती रामगुणाए यांनी त्यांच्या चटणी-सोका नावाच्या पहिल्या अल्बममध्ये वापरली. या अल्बममध्ये गाण्यांच्या त्रिनिदादीयन-इंग्रजी आणि त्रिनिदादीयन-हिंदुस्तानी आवृत्त्यांचे मिश्रण होते.

Singer Popo
गायक सुंदर पोपो

चटणी सोका संगीताचे प्रख्यात गायक सुंदर पोपो यांना ‘फादर ऑफ चटणी म्युझिक’ (Father of Chutney Music) म्हटले जाते. त्यांनी १९७० च्या दशकात ‘नानी अँड नाना’ (Nani and Nana) हे गाणे गाऊन या संगीत प्रकाराला जागतिक ओळख मिळवून दिली. द्रुपती रामगुणाए यांना ‘चटणी सोका क्वीन’ (Queen of Chutney Soca) म्हणून ओळखले जाते. १९८७ मध्ये त्यांनीच सर्वप्रथम चटणी-सोका हा शब्द प्रयोग आपल्या गाण्यातून लोकप्रिय केला.

रवी बी हे आधुनिक काळातील चटणी-सोका स्टार, ज्यांनी पारंपरिक वाद्यांसोबत बॉलिवूड आणि इलेक्ट्रॉनिक संगीताचा मिलाफ घडवून आणला आहे. रिकी जय हे या शैलीतील आणखी एक दिग्गज गायक ज्यांनी अनेक वर्षे या संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले आहे.

उल्लेखनीय इंडो-त्रिनिदादीयन आणि टोबॅगियन नागरिक

  • राजकारणामध्ये: बसदेव पांडे, कमला प्रसाद बिस्सेसर, नूर हसन अली, क्रिस्टीन कांगालू, रुद्रनाथ कपिलदेव, सिंभूनाथ कपिलदेव, रमेश महाराज, भदासे सगन मारज, रुडल मुनीलाल, अशफॉर्ड सिनानन, रोहन सिनानन, रणजीत चंद्रीसिंग, केनेथ लाला, शरण टिलुकसिंग, कमालुद्दीन मोहम्मद, देव रूप टीमल.
  • साहित्य क्षेत्रात: नोल बिस्संसुंदर, वाहनी कपिलदेव, इस्मित खान, सिपर्साद नायपॉल, शिवा नायपॉल, व्ही. एस. नायपॉल, लक्ष्मी परसाउद, केनेथ रामचंद, रवी महाराज, शानी मुटू, भास्कर सुनकारा, सॅम सेल्वॉन.
  • खेळामध्ये: सॅम्युअल बद्री, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, सुनील नरेन, रॉबिन सिंग, इन्शान अली, सोनी समाधीन, रांजिंद्र धनराज, सुरुज रघुनाथ, दीनानाथ रामनरीन, चरण सिंग, सुभाष गुप्ते, निकोलस पूरन, गोपाळ सहदेव, विकास मोहन, राजेश लाचू, अदिती सुंदरीसिंग, अमरनाथ बसदेव, करिष्मा रामह्रॅक, अमंडा समरू.
Sunil Narain
  • कला आणि मनोरंजन: सुंदर पोपो, राकेश यंकरन, पार्वती खान, हिरालाल रामपाल, आदेश, समरूप निशन प्रभु, लक्ष्मी सिंग, व्हॅले महाराज, निकी मिनाज, हिरा माथुर, लेनॉक्स मोहम्मद, चांदनी चांदका, शेलिदास, रिकी जय.
  • विज्ञान, औषध आणि आरोग्य: राजेंद्र परसाउद, कृष्णकुमार, लाल रामनाथ साव, सँड्रा रामधनी, रिया परसाद, जॉन लॅचमन, रुद्रनाथ कपिलदेव.
  • व्यवसाय, अर्थशास्त्र आणि वित्त: कृष्ण महाराज, हाजी गोकुळ मेह, सरन टिक्लूसिंग, अविनाश प्रसाद, महबूब बेन अली, सईद खान.
  • धर्म, परोपकार आणि तत्वज्ञान: भदासे सगन मारज, सत्यनारायण महाराज, अनंतानंद रामबचन, सिंभूनाथ कपिलदेव, सहदेव तिवारी, रवी महाराज, हाजी गोकुळ मेह.

या देशात सद्यस्थितीत ५० टक्क्यांच्या आसपास हिंदू धर्मीय नागरिक असून, ११ टक्के भारतीय मुस्लिम नागरिक आहेत. सर्वात मोठी सनातन धर्म महासभा, रामानंद, शैव, गणपती सच्चिदानंद चळवळ, ब्रह्माकुमारी महत्त्वाचे आहेत. तीनशेच्या आसपास शिख नागरिक आहेत. त्यांचं जुनाकुपूर गुरुद्वाराही आहे. मंदिरे, मशिदी, हिंदू शाळा, रोटीची दुकाने, पूजेसाठीच्या वस्तूंची दुकाने, भारतीय वस्तूंच्या बाजारपेठा, मिठाईची, कपड्यांची दुकाने, शहरे व त्यांची नावे ही हिंदुस्तानी आहेत. कलकत्ता सेटलमेंट, मद्रास, दिल्ली सेटलमेंट, रघू व्हिलेज, हिंदुस्तान व्हिलेज, कॉनपूर, पहारीगाव, गोपाळगाव, नानकगाव अशी गावांची नावे आहेत. भारतीय सण, नाटक, नौटंकी, रामलीला, रासलीला चालतात. येथील खाद्यसंस्कृतीवर भोजपुरी, अवधी खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. भारतीय सर्व मिठाई तिथे मिळते. नावांमध्ये अपभ्रंश मात्र आहे. जेवणामध्ये मसालेदार भारतीय जेवण, चटण्या, लोणचे यांची रेलचेल असते… या छोट्याशा देशात पावणे-दोनशे वर्षांपूर्वी कामासाठी स्थलांतरित झालेल्या हिंदी लोकांनी छोटा भारतच तिथे वसवला आहे, जिवंत ठेवला आहे.


Narendra Modi Trinidad Tobago PM
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »