शेतकरी संघटना एकरकमी चार हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यावर ठाम!

शंभर रुपयांवरून ऊसदराची बैठक निष्फळ
कोल्हापूर : ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी प्रतिटन ३,९०० रुपये एकरकमी देण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता एकरकमी ४,००० रुपये देण्याची मागणी कायम ठेवल्याने चर्चा फिस्कटली.
जिल्ह्यातील कारखानदारांच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार, हंगाम संपल्यानंतर प्रतिटन १०० रुपये देण्यात येणार होते. साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,२०० रुपये झाल्यास आणखी २०० रुपये देण्याचेही प्रस्तावित होते.
या अटींनुसार उसाला प्रतिटन एकूण ४,२०० रुपये मिळू शकले असते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शरद जोशीप्रणीत आणि इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी हा प्रस्ताव नाकारला.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर आणि उपजिल्हाधिकारी गजानन गुरव बैठकीला उपस्थित होते.
तीन दिवसांपासून शेतकरी संघटनांनी किणी टोल नाक्यावर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुश्रीफ आणि आवाडे यांनी जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांशी चर्चा करून हा प्रस्ताव पुढे आणला होता.
तीन तास चाललेल्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे महामार्गावरील चक्का जाम आंदोलन सुरूच ठेवण्याचा आणि ते अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.





