देशातील १५२ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशातील २०२६–२७ चा ऊस गाळप हंगाम वेग घेत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत देशातील १५२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. मागील वर्षी याच तारखेपर्यंत केवळ ३१ कारखाने सुरू झाले होते. यंदा आतापर्यंत १०५.४३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८.४५ लाख टन साखरेचे उत्पादन मिळाले आहे.

या हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील १२३ कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १४.१४ लाख टन उसाचे गाळप करून १.२० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

राज्याचा सरासरी साखर उतारा ७.९० टक्के नोंदविण्यात आला. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो. तेथील सात कारखान्यांनी ६.३३ लाख टन उसाचे गाळप करून ६० हजार टन साखरेचे उत्पादन घेतले. गुजरातमध्ये दहा कारखाने सुरू झाले असून, २.२१ लाख टन उसाचे गाळप आणि पाच हजार टन साखरेचे उत्पादन झाले. तमिळनाडूमध्ये सात कारखान्यांनी ४.७९ लाख टन उसाचे गाळप करून ४० हजार टन साखरेचे उत्पादन घेतले. तेथील साखर उतारा ८.५० टक्के आहे.

आंदोलन मिटल्यास हंगामाला गती

पश्चिम महाराष्ट्रातील संघटनांच्या आंदोलनामुळे काही महत्त्वाचे कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ऊस गाळप आणि साखर उत्पादनावर परिणाम होत आहे. आंदोलन मिटल्यास या भागातील रखडलेला हंगाम वेग घेईल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »