ऊसदरवाढीसाठी गावोगावी मोबाइल टॉर्च मोर्चा काढण्याचे आवाहन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

टेंभुर्णी : चालू ऊस गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी गावोगावी मोबाइल टॉर्च मोर्चे काढून जनजागृती करावी, असे आवाहन रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील यांनी केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. पाटील यांनी उर्जनी (टें.) येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोबाइल टॉर्च मोर्चा काढला. ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन साखर कारखानदारांचे लक्ष वेधावे, हा या मोर्चामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३,१०० रुपये दर दिला आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारातील साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५०० ते ४,७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे नमूद आहे. या वाढलेल्या दराचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळावा आणि कारखान्यांनी प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांकडून होत आहे.

साखरेचा आधारभूत दर वाढवण्याचीही मागणी

माहितीनुसार, साखरेचा आधारभूत दर २०१९ मध्ये प्रतिक्विंटल ३,१०० रुपये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर सात वर्षांत या दरात वाढ झालेली नसल्याने तो प्रतिक्विंटल ५,००० रुपये करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे.

या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »