विहिरीत बुडून ऊसतोड मजूर महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू

कवठेमहांकाळ : ऊसतोडीसाठी देशिंग येथील देसाई वस्ती परिसरात आलेल्या एका महिला मजूर आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रीती मनोहर राठोड (वय २५) आणि श्रेयस मनोहर राठोड (वय २) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे विजापूर येथील असून ऊसतोडीसाठी देशिंग येथे आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर प्रतीक्षा आणि श्रेयस खेळत असताना बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाहीत. रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास नंदकुमार बोराडे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यावर महिलेची चप्पल तरंगताना दिसली. त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी विहिरीत शोध घेतला. त्यावेळी प्रतीक्षा आणि श्रेयस यांचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विहीर सुमारे ७० फूट खोल असून त्यात अंदाजे ३० फूट पाणी होते. आव्हानात्मक परिस्थितीतही पथकाने कौशल्याने काही मिनिटांत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.






