दुष्काळाचा ऊस रोपवाटिकांना फटका; विक्री ४०–५० लाखांवरून लाखाखाली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इचलकरंजी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ ऊस रोपवाटिका व्यवसायालाही बसला आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत दरमहा साधारण ४० ते ५० लाख ऊसरोपांची विक्री होत असे. यंदा मात्र विक्रीचा आकडा एक लाखाच्या खाली घसरल्याने रोपवाटिका चालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

दिवाळीनंतर ऊस लागवडीचा हंगाम सुरू होत असला, तरी पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन पुढे ढकलले किंवा रद्द केले आहे. त्यामुळे रोपवाटिकांमध्ये तयार असलेली रोपे विक्रीविना पडून आहेत. लागवडीचा योग्य कालावधी निघून गेल्यास या रोपांची उपयुक्तता कमी होण्याची भीती आहे.

शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत जुलै-ऑगस्टमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आडसाली ऊस लागवड अडचणीत आली. उपलब्ध पाण्यावर लागवड झालेल्या उसाची वाढही खुंटली आहे. आता सुरू असलेल्या एकसाली लागवडीच्या हंगामातही पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन गुंडाळले आहे. नदीकाठच्या काही भागांतच मर्यादित प्रमाणात लागवड सुरू आहे.

रोपे तयार करण्यासाठी केलेला खर्च वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने रोपवाटिका चालकांना मोठ्या नुकसानीची चिंता आहे. रोपे विक्रीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कमी पाऊस, पाण्याअभावी घटलेली लागवड आणि विक्रीविना पडून असलेली रोपे—अशा दुहेरी संकटात रोपवाटिका व्यवसाय सापडला आहे.

“यंदाचा हंगाम रोपवाटिका व्यवसायासाठी आर्थिकदृष्ट्या मोठी कसोटी ठरत आहे,” असे ऊस रोपवाटिका चालक प्रल्हाद पोवार यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »