‘दुष्काळग्रस्त भागातील उसाला विशेष पॅकेज द्या’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने आणि पशुपालन क्षेत्र गंभीर संकटात सापडले असून, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. गाळपासाठीच्या उसाला प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. राज्यभर दुष्काळाचे सावट असून, सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत परिस्थिती गंभीर बनली आहे. जमिनीतील ओलाव्याचा अभाव, पाणीटंचाई आणि दीर्घकाळ कोरडी स्थिती राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी पेरणी आणि पशुपालनावरही झाला आहे.

पाणीटंचाईमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली असून, काही भागांत साखरेचा उतारा सुमारे ७.५ ते ७.७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निवेदनात म्हटले आहे. कमी उत्पादन आणि वाढता खर्च यामुळे साखर कारखान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.

कमी उताऱ्यामुळे निर्माण झालेला संपूर्ण आर्थिक भार शेतकरी किंवा साखर कारखान्यांवर टाकणे योग्य ठरणार नाही, असे महाडिक यांनी निवेदनात नमूद केले. दुष्काळग्रस्त भागातील साखर कारखान्यांना गाळप केलेल्या उसासाठी प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे विशेष अर्थसहाय्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. या मदतीमुळे कारखान्यांना दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेवर देण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »