दिवसा ऊसतोड, रात्री खोलीत कोंडले; ४२ मजुरांची सुटका!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परंडा : ऊसतोडणीसाठी मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून अमानुष परिस्थितीत काम करून घेत असल्याचा प्रकार परंडा तालुक्यातील कौडगाव येथे उघडकीस आला आहे. परंडा पोलिसांनी शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ठिकाणी छापे टाकून ४२ मजुरांची सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये छत्तीसगड, नेपाळ, उत्तर प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातील नांदेड, लातूर आदी भागांतील कामगारांचा समावेश आहे. या मजुरांना दिवसा ऊसतोडणीसाठी बाहेर नेले जात होते आणि सायंकाळी पुन्हा खोलीत कोंडून ठेवले जात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता सुविधाही नसल्याचे समोर आले. एका ठिकाणी केवळ एकच स्वच्छतागृह होते, तर दुसऱ्या ठिकाणी खोलीतच प्लास्टिकचे डबे ठेवण्यात आले होते. मजुरांना दररोज ८०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते; मात्र ती दिली जात नसल्याचे मजुरांनी सांगितले. हा प्रकार २० ते २५ दिवसांपासून सुरू असल्याचाही त्यांचा दावा आहे.

मजुरांना डांबून जबरदस्तीने ऊसतोडणीचे काम करून घेतले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सिरसाट, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय बाराते आणि पथकाने ही कारवाई केली.

कामगार अधिकाऱ्यांकडून जबाब नोंदविण्यात आले

सुटकेनंतर पोलिसांनी धाराशिव येथील कामगार अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांनी उपस्थित राहून मजुरांचे जबाब नोंदवले. मजुरांना परंडा तहसील कार्यालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काम आणि पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप

काम, पैसे, जेवण आणि राहण्याची सोय देण्याचे आमिष दाखवून मजुरांना आणले जात असल्याचा आरोपही मजुरांनी केला आहे. त्यानंतर त्यांच्याकडून ऊसतोडणी करून घेतली जात होती; मात्र कामाचे पैसे न देता त्यांना डांबून ठेवले जात असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »