शॉर्टसर्किटने ऊस पेटला; दीडशे एकरांवरील पीक खाक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

अमरापूर, (जि. अहिल्यानगर) : शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द, शाहापूर आणि चितळी परिसरात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तोडणीला आलेला सुमारे १०० ते १५० एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे उसासह ठिबक सिंचनाचे साहित्य, सोलर, पाइप, स्प्रिंकलर आणि केबल जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

मंगळवारी (ता. २७) सायंकाळी शाहापूर परिसरातील आत्माराम आहेर यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे वृत्त आहे. शेजारी उसाचे क्षेत्र असल्याने आणि जोराचा वारा वाहत असल्याने आग वेगाने पसरली. काही वेळातच सुमारे दीड किलोमीटरचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला.

आगीचे रौद्र रूप पाहता शेतकऱ्यांना ती लवकर आटोक्यात आणता आली नाही. आग विझवण्याच्या प्रयत्नात पाच ते सहा शेतकरी होरपळून जखमी झाले. ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर साखर कारखान्यांची अग्निशामक दले घटनास्थळी दाखल झाली; मात्र आग आटोक्यात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता.

नुकसानभरपाईची मागणी

दुष्काळी परिस्थितीत पाणी, खते, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी ऊस जगवला होता. तोडणीच्या टप्प्यावर आलेले पीक आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. बाधित क्षेत्राचे आणि जळालेल्या शेतीसाहित्याचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महावितरणचे कनिष्ठ अभियंता योगेश ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला असल्याचे सांगितले. विद्युत निरीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतरच आगीचे कारण आणि बाधित क्षेत्राबाबत अधिक स्पष्ट माहिती देता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »