थंडीची प्रतीक्षा, साखरेचे दर तेजीत; कोल्हापुरी गुळाची गुजरातमध्ये मागणी मंदावली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : परतीच्या पावसाने हुलकावणी दिली असून, नोव्हेंबर जवळ आला तरी थंडीचा कडाका वाढलेला नाही. त्यामुळे गुजरात आणि राजस्थानच्या बाजारपेठांत कोल्हापुरी गुळाची अपेक्षित मागणी अद्याप सुरू झालेली नाही. दुसरीकडे, साखरेच्या वाढत्या दरामुळे गुळाचे भाव तेजीत असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर बाजार समितीतील आवक सुमारे १६ हजार रव्यांनी घटली आहे.

कोल्हापूरच्या कणीदार आणि चवदार गुळाला देशभरात मोठी मागणी असते. येथील एकूण गूळ उत्पादनापैकी सुमारे ९० टक्के गूळ गुजरात आणि राजस्थानच्या बाजारपेठांत पाठवला जातो. त्यामुळे या बाजारपेठांतील मागणीवरच कोल्हापुरातील गुळाचे दर ठरतात.

कर्नाटकातील व्यापारी रोख पैसे देऊन गुळाची खरेदी करत असल्याने तेथे गूळ स्वस्त मिळतो. त्याउलट, कोल्हापुरातील खरेदीदार तीन आठवडे ते एक महिन्याच्या उधारीवर व्यवहार करतात. त्यामुळे कर्नाटकच्या तुलनेत कोल्हापुरातील गूळ प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी महाग ठरत असल्याचे चित्र आहे.

गूळ उत्पादन घटण्यामागील कारणे

साखर कारखान्यांची स्पर्धा : कारखान्यांकडून उसाला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात ५० ते ७५ गुऱ्हाळघरे सुरू असून, पुढे आणखी तेवढीच सुरू होण्याचा अंदाज आहे.
उसाची अपुरी वाढ : सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही.
साखरेचे वाढलेले दर : कोल्हापुरात साखरमिश्रित गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, घाऊक बाजारात साखरेचा दर प्रति क्विंटल ४,८०० रुपयांवर पोहोचला आहे. गुळाला सरासरी ५,४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने महागडी साखर वापरून गूळ बनवणे परवडत नाही. त्याचाही उत्पादनावर परिणाम झाला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »