साखर संकुल तोडफोड प्रकरण : शेट्टी, खोत यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे। शुगरटुडे

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २०१५ साली साखर संकुल येथे झालेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या तोडफोडीप्रकरणी न्यायालयीन सुनावणीस हजर न राहिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट येथील सत्र न्यायालयाने रद्द केले.

या प्रकरणात दीडशेंवर कार्यकर्त्यांव गुन्हा दाखल असून, त्यापैकी सुमारे ९० आरोपी आज न्यायालयात हजर झाले. सुनावणीस राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघेही उपस्थित होते. न्यायालयात हजर झालेल्या आरोपींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच आरोप निश्चितीच्या तारखेपर्यंत प्रत्येक सुनावणीला आरोपींनी प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी सत्र न्यायालयाने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्याची सूचना शिवाजीनगर पोलिसांना करण्यात आली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीदरम्यान दोघेही न्यायालयात हजर राहिल्याने त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसदराची थकीत रक्कम आणि एफआरपीप्रमाणे पैसे मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी साखर संकुलाच्या इमारतीत प्रवेश करून तोडफोड केल्याचा आरोप आहे. फुलदाण्या, काचा, खिडक्या तसेच फर्निचरचे नुकसान झाले होते. तसेच एका वाहनाला आग लावण्यात आली होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »