ऊसतोड कामगार महिलेची फडातच प्रसूती!

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
घनसावंगी : ऊसतोडीसाठी पारडगाव परिसरात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेची ऊसाच्या फडातच प्रसूती झाल्याची घटना शनिवारी (ता. २४) घडली. प्रसूतीनंतर काही तासांनी महिलेला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील एक ऊसतोड कामगार कुटुंब कामानिमित्त पारडगाव परिसरात आले होते. कुटुंबातील गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्या वेळी तातडीने वाहन आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्याने तिची ऊसाच्या फडातच प्रसूती झाली.
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने महिला आणि बाळाची तपासणी करून आवश्यक उपचार केले.
शासनाकडून गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड कामगार कुटुंबांना मूलभूत आरोग्य सुविधा वेळेवर मिळतात का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
रांजणी येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी आरोग्य पथकाने महिलेची तपासणी केल्याचे आणि बाळाला लसीचे डोस पाजण्यात आल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी बाळाला जालना येथे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.






