पशुधनाच्या चाऱ्यासाठी ३० टक्के ऊस राखीव ठेवा; कारखान्यांना निर्देश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : आगामी गाळप हंगामात जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एकूण ऊसतोडीपैकी किमान ६० ते ७० टक्के ऊसतोड मजुरांमार्फत करावी. तसेच एकूण ऊस क्षेत्रापैकी ३० टक्के ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने कारखान्यांनी उत्पादित बगॅस आणि मळीचा प्रत्येकी ३० टक्के साठा पशुधनासाठी चारा व पशुखाद्य निर्मितीकरिता राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हार्वेस्टरद्वारे ऊसतोड केल्यास उसाचा हिरवा पाला अर्थात वाढा चाऱ्यासाठी अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात. याउलट मजुरांमार्फत ऊसतोड केल्यास पशुधनासाठी वाढ्याची उपलब्धता वाढते आणि स्थानिक ऊसतोड मजुरांनाही रोजगार मिळतो. त्यामुळे हार्वेस्टरचा वापर मर्यादित ठेवून मजुरांमार्फत ऊसतोड करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शक्य असेल तेथे उसाच्या वाढ्याची कारखानास्तरावर साठवणूक करावी. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याची खबरदारी घेण्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वजनकाटे आणि ऊसतोड मजुरांवरही नियंत्रणाची गरज

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऊस वाळल्याचे कारण सांगून काही कारखान्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांना पैशांसाठी त्रास देत असल्याचेही आरोप आहेत. याशिवाय काही कारखान्यांच्या वजनकाट्यांवर उसाचे वजन कमी दाखवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर आणि कारखान्यांतील वजनकाट्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. अशा उपाययोजनांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »