क्रमांक येऊनही ऊसतोडणी रखडली; ऊस वाळण्याची भीती

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करून जगविलेला ऊस आता तोडणीअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. तोडणीचा अधिकृत क्रमांक येऊनही ‘तुम्ही मूळ सभासद नाही’, अशी कारणे देत कारखान्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप धाकलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
परिसरातील जवळपास ४० ते ५० शेतकरी या समस्येला सामोरे जात आहेत.वाढता उन्हाचा तडाखा आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतातील उभा ऊस वाळू लागला आहे. उपलब्ध पाणीसाठाही संपत आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊस कारखान्याला जावा, यासाठी शेतकरी निवेदने आणि अर्ज घेऊन संचालक व अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.“आम्ही मूळ सभासद नसलो, तरी लाभार्थी सभासद आहोत. मग ऊसतोडणीबाबत आमच्यावर अन्याय का?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असताना तोडणीला होणाऱ्या विलंबामुळे नुकसान वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वाळत असलेल्या उसाची तातडीने तोडणी करून दिलासा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.कारखाना प्रशासनाची भूमिका : पाणी नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला तोडणीमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगितले.
धाकलगाव परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. पाण्याअभावी ऊस वाळत असलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा; त्यांच्या उसाची तातडीने तोडणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, ऊसतोडणीतील कथित मनमानी थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





