एमव्हीके कारखान्याचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊस उत्पादकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

उमरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि परिसरातील ऊस गाळपाची क्षमता वाढावी, या उद्देशाने उद्योजक कवळे गुरुजी यांनी कुसुमनगर-वाघलवाडा येथे उभारलेल्या एमव्हीके अॅग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेड कारखान्याच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

कवळे गुरुजी यांच्या उद्योग समूहाचा हा चौथा कारखाना आहे. यापूर्वी उभारलेले तीन कारखाने सुरू असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने चौथ्या कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या नव्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला समाधानकारक दर देण्याच्या भूमिकेमुळे परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. वाढती लागवड आणि गाळपाची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नव्या उद्योगामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.

मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती

सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, मकरंद आबा पाटील, बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पाटील आणि कवळे गुरुजी यांनी दिली.

दररोज १० ते १२ हजार टन गाळपाची क्षमता

कवळे उद्योग समूहाच्या चारही कारखान्यांतून दररोज सुमारे १० ते १२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांना आपला ऊस गाळपासाठी पाठविण्याची सोय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »