शेतकरीहिताचा नागनाथअण्णांचा विचार पुढे न्या : उदय सामंत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

हुतात्मा साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ


वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी स्वतःच्या हितापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांचे विचार नव्या पिढीने जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६–२७ च्या ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सामंत यांच्या हस्ते झाला. खासदार धैर्यशील माने आणि आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामंत म्हणाले, हुतात्मा साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील प्रगतीचा मैलाचा दगड आहे. हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे कार्य कौतुकास्पद आहे. नागनाथअण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष आणि समाजहितासाठी दिलेले योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे.

कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी यांनी कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. संघटन आणि चळवळीच्या माध्यमातून उभा राहिलेला हुतात्मा साखर कारखाना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वाळव्याचे माजी सरपंच किरण नायकवडी, कोरेगावचे भैय्या नायकवडी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, शिवाजी पाटील, पूर्वाताई नाईक, अरुण खरमाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष किरण नायकवडी, जयश्री अहिर, डॉ. वसंत रामचंद्र भांडळकर, संचालक, सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्कार टाळला

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून मंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी सत्कार स्वीकारला नाही. केवळ फुलांनी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजा माळी, सेक्रेटरी मुकेश पवार आणि राजेंद्र मुळीक यांनी केले. आभार संचालक शरद बाबासाहेब थोरात यांनी मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »