दुष्काळावर मात, एआयची साथ; मराठवाड्यात एकरी १२५ टन उसाचे उद्दिष्ट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जालना : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचे आव्हान असतानाही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकरी १२० ते १२५ टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयोग ऊस उत्पादक शेतकरी रणजित गुजर यांनी यशस्वी केला आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन, अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आणि कृषी निविष्ठांचा गरजेनुसार वापर केल्यास प्रतिकूल परिस्थितीतही उत्पादन वाढवता येते, हे या प्रयोगातून समोर आले आहे.

ॲग्री एआय ट्रेनिंग फाउंडेशन, विद्या प्रतिष्ठान, बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एआय आधारित ऊस शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी रविवारी (ता. ११) अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस प्लॉट पाहणी व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाला राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सुमारे ३५० शेतकरी उपस्थित होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारे ऊस उत्पादक, इतर शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले. उपस्थितांनी गुजर यांच्या ऊस प्लॉटची पाहणी करून अवर्षणाच्या परिस्थितीत मिळवलेल्या उत्पादनाची माहिती घेतली.

चौदा महिन्यांच्या उसाची पाहणी

गुजर यांच्या शेतात ८६०३२ जातीच्या उसाची आडसाली लागवड करण्यात आली आहे. पाहणीवेळी पिकाचे वय १४ महिने होते. एका उसाचे अंदाजे वजन ३ ते ३.५ किलो असून, प्रतिएकर गाळपयोग्य उसांची संख्या ४० ते ४२ हजार असल्याची माहिती देण्यात आली. अपेक्षित साखर उतारा ११.२५ ते ११.५० टक्के नमूद करण्यात आला आहे.

तज्ज्ञांकडून एआय तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

ॲग्री एआय ट्रेनिंग फाउंडेशनचे एआय विभागप्रमुख तुषार जाधव आणि त्यांच्या पथकाने ऊस शेतीतील एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व, त्याचा वापर आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. समाधान सुरवसे यांनी अवर्षणाच्या परिस्थितीत ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती दिली.

एआयच्या मदतीने पाणी, अन्नद्रव्ये आणि रासायनिक निविष्ठांचा योग्य वापर केल्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय बचत झाल्याचे गुजर यांनी सांगितले. योग्य नियोजन आणि वेळेवर उपाययोजना केल्याने ऊस उत्पादन वाढवणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी राजेश टोपे यांनी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करून आधुनिक पद्धतीने ऊस शेती करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »