ऊस उत्पादकांचा कोगनोळीत चक्काजाम!

महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकरी रस्त्यावर
कोगनोळी : ऊस उत्पादकांच्या मागण्यांबाबत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी कोगनोळी टोलनाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले. घोषणाबाजीने आंदोलनस्थळ दणाणून गेले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी दाखल होताच आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांतून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
ठोस निर्णयाअभावी आंदोलनाचा मार्ग
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले; परंतु सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
साखरेला प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रतिटन ५०० रुपये द्यावेत, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादनासाठी बियाणे, कीटकनाशके, औषधे, मजुरी, ऊसतोडणी आणि वाहतुकीवर होणारा वाढता खर्चही सरकारने विचारात घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
इतर ठिकाणीही रास्ता रोकोचा इशारा
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर भागांतही विस्तारण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. कराड, सातारा आणि इचलकरंजी परिसरातही शेतकरी रस्त्यावर उतरणार असून पुणे-बंगळूर महामार्गावर आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही रास्ता रोको करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोगनोळीतील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. दिल्लीत ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी परिसरात सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे २०० पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. परिसरावर तात्पुरत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात आले.
आंदोलनाची व्याप्ती वाढल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सहभागी शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवली
चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहने पर्यायी मार्गांवर वळवली. बेळगावकडे जाणाऱ्या प्रवासी आणि अवजड वाहनांना पिंपळगाव-सिदनाळमार्गे पुढे पाठवण्यात आले. कर्नाटकात जाणाऱ्या काही वाहनांसाठी मुरगूड-चिकोडी हा पर्यायी मार्ग वापरण्यात आला.
आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला, तर शाळेत गेलेल्या काही विद्यार्थ्यांनाही गैरसोय सहन करावी लागली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.






