साखर एमएसपी, इथेनॉल दरवाढीची बैठक निष्फळ!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आजपासून महाराष्ट्र-कर्नाटकातील विविध ठिकाणी आंदोलनाची तयारी

पुणे : साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ४,६०० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करण्याच्या मागणीवर दिल्लीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, १३ ऑक्टोबरपासून कोगनोळी टोलनाक्यावर महामार्ग रोखो आंदोलन करण्याची तयारी केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात बैठक झाली. दुपारी तीन वाजता कृषी भवन येथे सुरू झालेल्या या बैठकीत दोन तास चर्चा झाली. मात्र, दोन्ही मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय झाला नसल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

आंदोलनाच्या भूमिकेवर संघटना ठाम

बैठकीत निर्णय न झाल्यास महामार्ग बंद आंदोलनाची तयारी करण्याचे निर्देश संघटनेच्या प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना दिले. आसाम आणि कर्नाटकातील महामार्गांवर आंदोलन सुरू असल्याचे राजू शेट्टी यांनी बैठकीदरम्यान सांगितले. तसेच, कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी एकत्र जमावे, असे आवाहन केले.

चर्चेत तोडगा न निघाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी सज्ज राहण्यास सांगितले.

दोन्ही राज्यांतील शिष्टमंडळाचा सहभाग

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले होते. त्यात शेट्टी, जे. योगेश पांडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

पुणे-बंगळूर महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यासह कर्नाटकातील विविध ठिकाणी, तसेच महाराष्ट्रातील कराड, इंदापूर, सातारा, परभणी आणि नांदेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »