ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये मुलांसह गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परभणी: गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबांसह साखर कारखान्यांच्या परिसरात आणि शेतांमधील तात्पुरत्या वस्त्यांत राहायला आले आहेत. या वस्त्यांमध्ये जाऊन कामगारांच्या लहान मुलांची आणि गर्भवती महिलांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी किशोर खुरसणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा परिषदेत मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय बैठक झाली. बैठकीत माता-बाल संगोपन आणि लसीकरणासह आरोग्यवर्धिनी केंद्रांमधील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पाणी शुद्धीकरण, कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण, संशयित रुग्णांची तपासणी, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील सेवा आणि ऑनलाइन नोंदणी याबाबतही सूचना देण्यात आल्या.

विशेष मोहिमेत ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांतील ० ते १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत तपासणी होईल. जन्मजात दोष, विविध आजार, पोषणातील कमतरता आणि विकासातील विलंब किंवा दिव्यांगत्व या निकषांनुसार मुलांचे मूल्यमापन केले जाईल. गरजेनुसार त्यांना मोफत उपचार किंवा उच्चस्तरीय आरोग्यसेवेसाठी संदर्भ दिला जाईल.

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये विशेष आरोग्य मोहीम राबवून सर्वेक्षण ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावरून एकत्रित अहवाल सादर केला जाणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »