व्हीएसआय : ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगाला जोडणारा महत्वाचा दुवा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

व्हीएसआय: ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगाला जोडणारा महत्वाचा दुवा

डिसेंबर १९६५ साली राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर यांच्या धर्तीर दक्षिण भारतासाठी प्रादेशिक ऊस संशोधन संस्था असावी, यासाठी रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने समिती गठीत केली आली  होती. व्हीएसआयच्या स्थापनेमध्ये त्यावेळचे सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी १९७४ साली “ब्लू प्रिंट फॉर  प्रोग्रेस”  या पुस्तिकेत साखर कारखान्याचे वर्तमान, भूत व भविष्य या अनुषंगाने अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली व त्याच धर्तीवर या संस्थेची पायाभरणी व विकास सुरू झाला.

त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई या संस्थेने १९७४-७५ मध्ये राष्ट्रीय साखर संस्थेच्या धर्तीवर १९ नोव्हेंबर १९७५ रोजी साखर संस्था स्थापन केली. अशाप्रकारे सोसायटी रजिस्ट्रेशन अँक्ट अंतर्गत १४ ऑक्टोबर १९७५ तसेच बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० या कायद्यांतर्गत १९ नोव्हेंबर १९७५ रोजी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट स्थापना झाली.

Vasant Dada Patil

या संस्थेचे विश्वस्त तथा अध्यक्ष म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, त्याचबरोबर यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे व शंकरराव कोल्हे या मान्यवरांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. या संस्थेच्या वित्तीय खर्चासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या प्रति टनामागे एक रुपया याप्रमाणे देण्याचे ठरले.

या संस्थेचे पहिले सल्लागार म्हणून एस. एन. गुंडूराव यांनी १९७५ ते १९८५ पर्यंत काम पाहिले, त्यानंतर डी. जी. हापसे यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. १ मार्च १९८९ रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे वयाच्या ७२ व्या वर्षे निधन झाल्यानंतर २० एप्रिल १९८९ रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची संस्थेच्या बोर्ड  ऑफ ट्रस्टचे (विश्वस्त मंडळ) चेअरमन तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे (नियामक मंडळ) अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळे पासून संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत ही संस्था देश पातळीवर तसेच जागतिक पातळीवर नावारूपास आली.

यामध्ये खरे तर साहेबांची प्रगल्भता, शास्त्रीय दृष्टिकोन व साखर उद्योगा विषयी असलेल्या सूक्ष्म आकलन, त्याचबरोबर त्यांनी निवड केलेले महासंचालक यांचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन ६९ टनापासुन ९४ टनापर्यंत वाढल्याचा गौरवपूर्ण उल्लेख १ सप्टेंबर २००६ रोजी बी. पी. पाल यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त महामहीम राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे केला होता. हे संस्थेच्या “संशोधनेंन समृद्धी” या घोषवाक्याला साजेशी अशी कामगिरी होती.

एका बाजूला चांगल्या वाणांची पैदास करण्यासाठी आपण ऊस पैदास संस्था, कोईमतूर यांच्या धर्तीवर आंबोली येथे २००६ साली १५०० ते २००० विविध देशी-विदेशी ऊस प्रजातींचे संगोपन व विविध ऊस वाणांची  पैदास करण्यासाठी ऊस प्रजनन केंद्र निर्माण केले, ही खरे तर महाराष्ट्राला इतर राज्यावरती अवलंबून राहावे लागू नये यासाठीच भविष्यातील विचार करून आपल्या दूरदृष्टीचा तसेच संशोधनावर असलेले आपली श्रद्धा व शेतकऱ्याप्रति असलेली निष्ठा मानावी लागेल.

Sharad Pawar

अभ्यासू आणि जाणकार नेते श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० पासून ऊस शेती ज्ञानयाग या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. तसेच २००६ पासून महिलां शेतकऱ्यांसाठी ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण आणि विविध राज्यस्तरीय ऊस परिषद, राष्ट्रीय परिषदा, संवाद मेळावे तसेच २०१६ पासून आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन (पथदर्शी ऊस प्लॉट) या माध्यमातून संस्थेने विविध संशोधन प्रकल्प तसेच शिफारशी या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे.

त्याचबरोबर व्हीएसआय निर्मित विविध निविष्ठा, यामध्ये वसंत ऊर्जा या जैवसंजीवकामुळे ऊस शेती बरोबर इतर पिकांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास अत्यंत मौलिक मदत झाली आहे. या उत्पादनामुळे वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे, त्याचबरोबर ऊती संवर्धित रोपामुळे रोगमुक्त व अत्यंत निरोगी बेणे शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.

आपल्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विभागअंतर्गत विविध विभागामार्फत दर्जेदार असे संशोधन होत आहे, तसेच शुगर टेक, शुगर इंजीनियरिंग व अल्कोहोल टेक तसेच पाठीमागील वर्षी इथेनॉलसाठी उत्कृष्टता केंद्र या माध्यमातून साखर कारखानदारांना दर्जेदार अशा सेवा पुरवून कारखान्यांची कार्यक्षमता वाढण्यास अत्यंत मौलिक अशी मदत संस्थेतील शास्त्रज्ञांनी केली आहे.

संस्थेने सुरू केलेल्या विविध कोर्सेसमुळे कारखान्यास लागणारे तंत्रज्ञ निर्माण होण्यास मदत झाली आहे, त्याचबरोबर विविध विद्यापीठांनी व्हीएसआयला संशोधन संस्था म्हणून मान्यता देऊन पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवीधारक विद्यार्थी येथे घडत आहेत. त्यामुळे दर्जेदार संशोधन होण्यास मदत झाली आहे.

संस्थेचे अद्यावत ग्रंथालय व दुर्मिळ पुस्तकांचा खजिना, प्रबंध, नियतकालिके, संशोधन मासिके व वृत्तपत्रे यामुळे ऊस पीक, त्याचे उपपदार्थ व इतर तांत्रिक माहिती मिळण्यास नवोदित संशोधकांना अत्यंत फायदेशीर ठरत आहे. संस्थेचे आतापर्यंत उत्कृष्ट असे कार्य असून, संस्थेने मांजरी, नायगाव, लोणारवाडी, (ता.दौंड), आंबोली, पाथरवाला (जालना), नागपूर तसेच खानदेश (प्रस्तावित) या ठिकाणी प्रक्षेत्र घेऊन ऊस विकासाचे कार्य वाढवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये भारत सरकारच्या महत्वकांक्षी इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राममुळे इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देण्यामध्ये संस्थेचा वाटा महत्त्वाचा असणार आहे.

२०१६ हे साल हे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अमृत महोत्सवी जन्म दिनानिमित्त पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन त्यावेळचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. संस्थेचे तत्कालीन महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी “वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट:  व्हिजन अँड अकंप्लिशमेंट’’ या पुस्तकाचे संपादन करून संस्थेची माहिती एकत्र करण्याचे महत्वाचे असे कार्य केले. ३० सप्टेंबर २०२२ रोजी महासंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.

१ ऑक्टोबर २०२२ पासून संभाजी कडू पाटील (निवृत्त प्रशासकीय अधिकारी) यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे विद्यमान महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी संस्थेमध्ये सकारात्मक बदल करत संस्थेमध्ये डिजिटल सेवेच्या माध्यमातून प्रशासन गतिमान केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती यासाठी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यासोबत काम करून ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग व त्या अनुषंगाने संशोधन यशस्वीरित्या राबविण्यात आले.

पुढील वर्षाच्या २० ते २२ फेब्रुवारी मध्ये चौथी  आंतरराष्ट्रीय ऊस परिषद व प्रदर्शन  आयोजन करण्यात येत आहे, त्यासाठी चक्रीय जैव-अर्थव्यवस्था: ऊस उद्योगाची संजीवनी हे घोषवाक्य घेऊन विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहे. स्वर्गीय अजितदादा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आय.ओ.टी यांच्या संशोधनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली होती. दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध कारखाना कार्याक्षेत्रावरती राज्यशासन, व्ही.एस.आय व कृषि विकास विश्वस्त, बारामती याच्या संयुक्त विद्यमानाने शेतकऱ्यांच्या शेतावरती कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना राबवून माहिती संकलनाचे काम सुरु झाले होते.

अशाप्रकारे एका लहानशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे, त्यासाठी संस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, विश्वस्त, नियामक मंडळ, महासंचालक, संचालक तसेच संस्थेतील शास्त्रज्ञ, कर्मचारी, ऊस कारखानदार, तंत्रज्ञ व खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत समृद्धीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट “संशोधनेन समृद्धी” हे घोषवाक्य सार्थ ठरवत अखंड कार्यरत आहे व करत राहील. देदीप्यमान कार्यकर्तृत्व असलेल्या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.  

डॉ. गणेश पवार 

ऊस पिक अभ्यासक तथा

सहाय्यक प्राध्यापक,

श्री विठ्ठल कृषि महाविद्यालय, वेणुनगर, पंढरपूर.

मो नं: ९६६५९६२६१७

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »