ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : उसाला प्रतिटन ३,५०० रुपयांपेक्षा कमी दर देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात सोलापूरसह विविध भागांतील शेतकरी सहभागी झाले.

मोर्चानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र, मागण्यांवर तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दुपारपासून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या देऊन होते.

उसाला प्रतिटन ३,५०० रुपयांपेक्षा कमी दर देऊ नये, अशी संघटनेची ठाम भूमिका आहे. या मागणीबाबत प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनाला महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७०० पोलिसांचा बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुमारे ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि दंगल नियंत्रण पथकांतील जवानांचाही त्यात समावेश होता. परिसरातील प्रवेशमार्गांवर बॅरिकेड्स लावून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »