पाकिस्तानात ऊस गाळपावरून तिढा; साखर निर्यातीच्या मागणीमुळे सरकारची कोंडी!

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक, साखर कारखानदार आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. गाळप वेळेत सुरू करून उसाला योग्य दर द्यावा आणि शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळावेत, अशी मागणी ऊस उत्पादकांनी केली आहे. दुसरीकडे, साखर निर्यातीला परवानगी मिळावी, अशी कारखानदारांची मागणी आहे. मागील निर्यातीनंतर देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढल्याचा अनुभव लक्षात घेऊन सरकार निर्यातीबाबत सावध भूमिका घेत आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांना वेळेवर गाळप, उसाचा योग्य मोबदला आणि त्वरित देयके अपेक्षित आहेत. मात्र, साखरेचा साठा आणि विक्री, निर्यातीबाबतची अनिश्चितता तसेच आर्थिक अडचणींचा दाखला देत कारखानदार गाळप लांबवत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
सध्या कारखानदारांना दोन लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. आणखी ११ लाख टन साखर निर्यात करण्याची त्यांची मागणी आहे. पाकिस्तानने आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत सुमारे १६.५६ लाख टन साखरेची निर्यात केली. त्यातून सुमारे २२.९९ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे परकीय चलन मिळाल्याचे वृत्तात म्हटले आहे. मात्र, मागील निर्यातीमुळे देशांतर्गत साखरेच्या किमती वाढल्याने पुढील निर्यातीबाबत सरकार निर्णय घेताना सावध आहे.
पाकिस्तानमध्ये साखरेच्या किमतींबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार, किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो सुमारे १४० पाकिस्तानी रुपये आहे; सीमावर्ती भागांतील काही शहरांत तो २३० ते २५० पाकिस्तानी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तुलनेने, भारतात साखर प्रतिकिलो सुमारे ५५ ते ६० रुपये दराने विकली जात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
सरकारसमोर निर्यातीच्या निर्णयाचा पेच आहे. निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारातील साखरेची उपलब्धता घटून दर वाढू शकतात. त्यानंतर गरज भागवण्यासाठी आयात करावी लागल्यास आयात केलेला साठा पडून राहण्याची आणि सरकारवर आर्थिक भार येण्याची शक्यता आहे. साखर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानमार्फत निर्यातीचा पर्यायही सरकारच्या विचाराधीन असल्याचे वृत्तात नमूद आहे.
भारतावर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता
पाकिस्तानच्या साखर निर्यात–आयात धोरणाचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता मर्यादित असली, तरी जागतिक बाजारावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानने निर्यात वाढवल्यास जागतिक बाजारातील साखरेचा पुरवठा वाढू शकतो; निर्यात रोखून आयात वाढवल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीवर परिणाम होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही साखर उत्पादक व निर्यातदार देश असल्यामुळे जागतिक बाजारातील स्पर्धेवरही या धोरणाचा परिणाम होऊ शकतो. भारत–पाकिस्तान व्यापारावरील निर्बंधांमुळे पाकिस्तानातून भारतात थेट साखर आयात होण्याची शक्यता मात्र सध्या मर्यादित असल्याचे बोलले जात आहे.






