मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी २० नोव्हेंबरला सत्याग्रह!

ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक
बार्शी : उसाला उत्पादनखर्चावर आधारित प्रतिटन ६,५०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे. या मागणीसाठी २० नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घाडगे यांनी केले.
केंद्र सरकारने ऊसदराच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी प्रा. मूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. ही समिती ४ नोव्हेंबर रोजी पुण्यातील मांजरी येथील साखर संकुल कार्यालयात आली होती. त्या वेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर, वैभव काकडे, फिरोज फडके आणि लक्ष्मण घाडगे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.
साखर उताऱ्यानुसार उसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर मिळावा, तसेच शिरगण समितीच्या शिफारशीनुसार दुसऱ्या हप्त्यापोटी ७५० रुपये देण्यात यावेत, अशी मागणी किसान सभेने केली. उत्पादनखर्चाच्या तुलनेत सध्या मिळणारा ऊसदर अपुरा असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सभेचे म्हणणे आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही कारखाने प्रतिटन ४,२०० रुपयांपर्यंत दर देत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतील दर कमी असल्याचा मुद्दाही सभेने उपस्थित केला.
तमिळनाडू सरकारने यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन ४,२५० रुपये दर जाहीर केल्याचे किसान सभेने निदर्शनास आणले. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने उत्पादनखर्च आणि रास्त दरासंबंधीची माहिती केंद्र सरकारला दिल्यानंतरही ऊसदर जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा आरोप सभेने केला.
ऊस उत्पादकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी होणाऱ्या सत्याग्रहात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.






