ऊसदरासाठी सातारा जिल्ह्यात आंदोलन तीव्र!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

४,२०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी

सातारा : उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. कारखान्यांनी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याबाबत परिपत्रक काढल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी सातारा, कोरेगाव आणि कराड तालुक्यांत आंदोलन करण्यात आले.

कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याजवळील शिरवडे फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी परिपत्रकाची होळी केली. पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. सातारा तालुक्यातील शिवथर येथे शेतकऱ्यांनी ऊसतोड बंद पाडत ऊस वाहतूक रोखली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन ४,२०० रुपये दर देण्याची हमी दिली होती, असा संघटनांचा दावा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने देत असलेल्या दराप्रमाणे साताऱ्यातील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याचे परिपत्रक काढण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला.

शिरवडे फाटा येथील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते. पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांचीही उपस्थिती होती. पाटण तालुक्यातील विडजापुर–गुजरमहागाव परिसरातील नवारस्ता येथेही आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखला.

प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »