ऊसदर बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

सोलापूर : ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. मात्र, १९ नोव्हेंबरच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योग्य दर जाहीर न झाल्यास तिसरे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
यंदा गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
बैठकीत ऊसदराचा अंतिम निर्णय घेण्याबाबत चर्चा होणार असून, साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.






