आधुनिक तंत्रज्ञानातून ऊस शेतीचे उत्पन्न वाढवा : राजेश टोपे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

घनसावंगी : ऊस शेतीचे उत्पादन वाढवून ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड द्यावी. ठिबक सिंचन, पाण्याचे व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता आणि बदलत्या हवामानानुसार पीक नियोजन यावर भर देऊन एकरी १०० मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

स्व. कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त आरगडे गव्हाण येथे ‘आठवणी साहेबांच्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतिशील शेतकरी रणजीत शंकरराव गुजर यांच्या शेतातील ऊस तोडणीचा शुभारंभ टोपे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही टोपे होते.

याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ठिबक सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाचे प्रमुख तुषार जाधव तसेच व्हीएसआय, पुणे येथील तज्ज्ञांनी शास्त्रीय ऊस शेतीच्या पद्धतींची माहिती दिली.

टोपे म्हणाले, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि बदलते हवामान ही ऊस शेतीसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनातून पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पाणी, खते आणि जमिनीचे योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हवामान, पिकाची वाढ आणि पाण्याची गरज याबाबत अधिक अचूक निर्णय घेता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असेही त्यांनी सांगितले.

ऊस तोडणीनंतर पाचट जाळण्याऐवजी त्याचा शेतात वापर करावा. यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढून सुपीकता टिकण्यास मदत होते. पाणी, खते आणि मजुरीचे नियोजन करून खर्च कमी करण्यावरही कार्यक्रमात भर देण्यात आला. यावेळी शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »