*स्वाभिमानी*ची कृष्णा कारखान्यावर धडक, कार्यकारी संचालकांची यशस्वी शिष्टाई

कराड । शुगरटुडे
साखरेची किमान विक्री किंमत (MSP) ५० रुपये निश्चित केल्याशिवाय आणि उसाला ५,००० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नका, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर धडक देत प्रचंड निदर्शने केली. पोलिसांनी राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडवले. संघटनेच्या आवाहनानंतर आम्ही त्वरित कारखान्याचे गाळप थांबवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी यावेळी केले. त्यानंतर शेट्टी यांनी कारखान्यावरील आंदोलन स्थगित केले.
यावेळी राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक पाऊल उचलत थेट गव्हाणीत उड्या मारण्याचा इशारा दिला. “शेतकऱ्यांचा विश्वासघात करून घाईघाईने कारखाने सुरू करणार असाल तर पहिल्यांदा त्या गव्हाणीच्या रसात आमचं रक्त जाईल आणि मग तुमचा ऊस जाईल!” असा घणाघाती इशारा त्यांनी दिला.
- ऑक्टोबर महिन्यात उसाची रिकाव्हरी (साखर उतारा) अत्यंत कमी असते. अपरिपक्व उसाचे गाळप केल्याने यंदा वजनात घट आणि पुढील वर्षीच्या एफआरपीमध्ये (FRP) घसरण होऊन शेतकऱ्यांचे सलग दोन वर्षे प्रचंड आर्थिक नुकसान होते.
- एमएसपी वाढवण्याची नामी संधी गमावली: दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात देशातील निम्म्याहून अधिक साखर तयार होते. कोल्हापूर जिल्हा व संपूर्ण कर्नाटक बंद ठेवले असताना, जर सर्व कारखानदारांनी एकजूट दाखवून उत्पादन रोखले असते, तर सणाच्या तोंडावर साखरेची टंचाई निर्माण होऊन केंद्र सरकारला एमएसपी वाढवणे भाग पडले असते, असा दावा शेट्टी यांनी केला.
“एमएसपी ५० रुपये करा किंवा टनाला ५००० रुपये दर द्या!”
आंदोलनादरम्यान राजू शेट्टी यांनी शेतकरी हित जपण्यासाठी तीन प्रमुख मागण्या मांडल्या:
- साखरेची एमएसपी ५० रुपये करा: गेल्या ७ वर्षांत केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. एमएसपी ५० रुपये केल्यास बँका कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर चांगले कर्ज (Pledge Loan) देतील, ज्यामुळे कारखानदारांना शेतकऱ्यांना पहिली उचल मोठी देणे शक्य होईल.
- टनाला ५००० रुपये दर अथवा ५०० रुपये भरपाई: कारखानदारांनी ५,००० रुपये प्रति टन दर जाहीर करावा किंवा केंद्र सरकारने घाईघाईने ऊस तोडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी टनाला ५०० रुपये थेट भरपाई द्यावी.
- इथेनॉलमधील नफ्याचा वाटा द्या: पेट्रोलचा भाव ११३ रुपये झाला, पण सी-हेवी इथेनॉलचा दर ५७.९५ रुपयांवरच अडवून ठेवला . ऑइल कंपन्यांनी १ लाख ५० हजार कोटींचा नफा कमावला, पण हा पैसा कारखानदार व शेतकऱ्यांना दिला नाही
कृष्णा कारखान्याचे एमडी बाजीराव सुतार हे स्वत: आंदोलकांना सामोरे गेले. . कारखान्यात पहिल्या दिवशी २,३०० टन आणि दुसऱ्या दिवशी ३,५०० टन असे एकूण ५,७०० टन गाळप झाले होते. परंतु स्वाभिमानीच्या बंदच्या हाकेनंतर कारखान्याने गाळप पूर्णपणे बंद ठेवले आहे, याकडे सुतार यांनी लक्ष वेधले.
त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा आदर करत कारखाना बंद ठेवला आहे. आम्ही तुमच्यासोबतच आहोत. यासंदर्भात चेअरमन डॉ. सुरेश बाबा भोसले आणि संचालक मंडळाची तातडीने बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.”






