दुष्काळामुळे ऊस उत्पादक अडचणीत; नुकसान भरपाईचा विचार : देसाई

सातारा : दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्याच्या पर्यायावर शासनस्तरावर विचार सुरू असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई यांनी दुष्काळ, ऊस उत्पादकांचे प्रश्न आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत भूमिका मांडली. पाण्याच्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार उपाययोजनांचे धोरण ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. साखर उताऱ्यातही दीड टक्क्यापर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे.
यंदा काही साखर कारखान्यांनी मुदतीपूर्वी गळीत हंगाम सुरू केला आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांचे हित, साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि बाजारातील साखरेची उपलब्धता या तिन्ही बाबींमध्ये समतोल राखण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखानदारांनी निर्णय घेताना सर्व संबंधित घटकांच्या हिताचा विचार करावा, असे आवाहनही देसाई यांनी केले.
जिल्हा बँकेच्या जागावाटपावर पुढील बैठकीत चर्चा
जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीने एकत्रितपणे लढवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सोसायटी मतदारसंघातील उर्वरित नऊ जागांच्या वाटपावर घटक पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. यासंदर्भात आतापर्यंत दोन बैठका झाल्याचे देसाई यांनी सांगितले.






