काटामारीद्वारे २६०० कोटींची लूट अशक्य; दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत ‘विस्मा’चा खुलासा

पुणे । शुगरटुडे
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये उसाची काटामारी करून शेतकऱ्यांची २६०० कोटी रुपयांची प्रचंड लूट केली जात असल्याचा दावा करणारे पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार, वस्तुस्थितीला धरून नसलेले आणि केवळ अफवा पसरवणारे आहे, असा सडेतोड खुलासा ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ने (विस्मा – WISMA) केला आहे.
साखर कारखान्यांमधील ऊस वजनाची आधुनिक व पारदर्शक यंत्रणा आणि त्यावर असलेले शासकीय नियंत्रण समजून न घेता प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अशा बातम्यांमुळे शेतकरी व साखर उद्योगामधील विश्वासाच्या नात्याला तडा जात असल्याची तीव्र खंत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित दैनिकाच्या मुख्य संपादकांना पाठवलेल्या अधिकृत निवेदनात ठोंबरे यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची संपूर्ण तांत्रिक कार्यप्रणाली (SOP) आणि वस्तुस्थिती स्पष्ट करत सत्य समोर आणले आहे.
इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि ‘फूलप्रूफ’ पारदर्शक यंत्रणा
विस्माने दिलेल्या खुलास्यानुसार, राज्यातील साखर कारखान्यांमध्ये वजन प्रक्रियेत छेडछाड करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे:
- १००% इलेक्ट्रॉनिक वजन काटे: राज्य शासनाच्या आदेशानुसार मागील पाच वर्षांपूर्वीच जुने मेकॅनिकल काटे बंद करून सर्व कारखान्यांत इलेक्ट्रॉनिक वजन काटे सक्तीने बसवण्यात आले आहेत.
- पंचांसमक्ष तपासणी व सील: दरवर्षी गळीत हंगामापूर्वी वजनमापे निरीक्षकांच्या उपस्थितीत आणि पाच शेतकरी पंचांच्या समोर वजन काट्याची काटेकोर पडताळणी केली जाते; त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत त्याला सील लावले जाते व मगच काटा वापरण्यास परवानगी मिळते.
- संगणकीय सुरक्षितता: हे काटे सील केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही. तसेच संगणकाला बाहेरून कोणतीही दुसरी केबल जोडता येत नाही.
- स्वयंचलित बिलिंग व प्रिंटेड स्लिप: उसाचे वाहन काट्यावर आल्यानंतर वजन आपोआप सेव्ह होऊन थेट बिलिंग विभागाकडे वर्ग केले जाते. कर्मचाऱ्याला हाताने वजन नोंदवण्याची किंवा लिहिण्याची कोणतीही सोय यात नसते. संगणकातून स्वयंचलित (ऑटोमॅटिक) प्रिंटेड स्लिप निघून ती तत्काळ वाहनचालक, वाहतूकदार व शेतकऱ्याला दिली जाते.
दररोज कॅलिब्रेशन आणि १०% वाहनांचे फेरवजन (क्रॉस चेकिंग)
केवळ सील लावण्यावरच न थांबता कारखान्यांमध्ये दररोज कठोर तपासणी केली जाते:
- कारखान्याचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर दररोज काट्याच्या क्षमतेच्या १० टक्के प्रत्यक्ष वजने ठेवून कॅलिब्रेशन व पडताळणी करतात.
- प्रत्येक पाळीमध्ये (शिफ्ट) वजन झालेल्या वाहनांपैकी किमान १० टक्के वाहनांचे अचानक फेरवजन (Re-weighing / Cross Checking) करून खात्री केली जाते. त्यामुळे वजनात फरक येण्याचा कोणताही वाव उरत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची करडी नजर
साखर आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भरारी पथके कार्यरत आहेत. या पथकात जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, पोलीस विभाग, वजनमापे निरीक्षक आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो. ही पथके कारखान्यांच्या काट्यांची अचानकपणे तपासणी करतात; तपासणीत किंचितही तफावत आढळल्यास काट्याची मान्यता तात्काळ रद्द करून कारखान्याला मोठा दंड आकारण्याची तरतूद आहे.
‘उद्योग आणि शेतकऱ्यांमध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न; पत्रकारांनी प्रत्यक्ष पडताळणी करावी’
महाराष्ट्रातील साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून, या माध्यमातून ग्रामीण भागात वार्षिक १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. ऊस हे एकमेव असे नगदी पीक आहे, ज्याचा हमीभाव लागवडीपूर्वीच जाहीर होतो आणि पिकवलेला १०० टक्के ऊस हमीभावाने खरेदी केला जातो.
असे असताना काही शेतकरी व साखर उद्योगविरोधी घटकांकडून अविश्वासाची दरी निर्माण करण्यासाठी कारखान्यांना बदनाम करण्याचे हेतूपुरस्सर प्रयत्न होत आहेत. वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि तांत्रिक कार्यप्रणाली समजून न घेता एकतर्फी बातम्या प्रसिद्ध करणे अत्यंत खेदजनक आहे. पत्रकारांनी व संपादकांनी स्वतः कारखान्यांना भेटी देऊन वस्तुस्थितीची खात्री करावी आणि सत्य लोकांसमोर आणावे, असे आवाहन बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे.
‘शुगरटुडे’ची भूमिका
शेती आणि शेतीपूरक उद्योगांबाबत वारंवार धादांत खोटी आणि दिशाभूल वृत्ते प्रसिद्ध करण्याची प्रकार वाढले आहेत. त्याबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो. केवळ सनसनाटी निर्माण करणे म्हणजे पत्रकारिता, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कसलेही पुरावे न देता, बातम्या प्रसिद्ध करण्याचे प्रकार निंदनीय आहेत. या प्रकरणातही संबंधित वृत्तपत्राने कसलाही पुरावा दिलेला नाही. केवळ हवेतल्या गोष्टी केल्या आहेत. पुरावे दिले असते, तर ‘शुगरटुडे’ने स्वागतच केले असते. परंतु अशा बातम्यांमुळे केवळ संभ्रम होतो. ते टाळायला हवे.
साखर कारखानदारी म्हणजे सर्व आलबेल आहे, असेही आम्हाला म्हणायचे नाही. त्यातही अनेक अपप्रवृत्ती आहेत, त्यावर नेमके बोट ठेवण्याची गरज आहे. सरसकट साखर उद्योगाला संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे योग्य ठरणारे नाही. ग्रामीण भागाची लाइफलाइन ठरलेल्या या उद्योगाबाबत पुरावे असेल तर आवर्जून बोलावे, या मताचे आम्ही आहोत. या क्षेत्रातबाबत ‘शुगरटुडे’देखील मोठे गौप्यस्फोट करणार आहे; मात्र ते कागदांसह… म्हणजेच पुराव्यांसह…






