सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची १०० कोटींची मर्यादा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे निकष राज्य सरकारने बदलले आहेत. नव्या निकषांनुसार, एका कारखान्याला कमाल १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत साखर आणि इथेनॉलच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम थेट कर्जखात्यात जमा करावी लागणार आहे.

सहकार विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शुद्धिपत्रक जारी केले. कारखान्याच्या स्थिर मालमत्तेच्या आधारे ठरणारी पात्र कर्जरक्कम आणि १०० कोटी रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढेच कर्ज मंजूर केले जाईल. परतफेडीची क्षमता तपासताना मागील तीन आर्थिक वर्षांतील प्रत्यक्ष कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.

या योजनेत आतापर्यंत ३६ सहकारी साखर कारखान्यांच्या ४१ कर्जप्रकरणांना ५,४८८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले आहे. मात्र, अनेक कारखान्यांकडील मुद्दल आणि व्याजाची थकबाकी वाढल्याने वसुलीचे आव्हान निर्माण झाले आहे.

नव्या प्रकल्पांवर आणि गुंतवणुकीवर निर्बंध

कर्जफेड पूर्ण होईपर्यंत राज्य सरकार आणि एनसीडीसीच्या पूर्वपरवानगीशिवाय कारखान्यांना नवे प्रकल्प सुरू करता येणार नाहीत. स्थिर मालमत्तेतील नव्या गुंतवणुकीवरही निर्बंध असतील. तसेच व्यवस्थापनात बदल झाल्यास त्याची माहिती सरकारला तातडीने द्यावी लागेल.

कर्जाचा वापर, व्याज आणि परतफेडीची स्थिती तसेच तारण मालमत्ता तपासण्यासाठी प्रत्येक कारखान्यावर विशेष लेखापरीक्षक नेमला जाणार आहे. कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत शासकीय अनुदानाची रक्कमही मुद्दल आणि व्याजापोटी कर्जखात्यात जमा करावी लागणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »