उसाला प्रतिटन ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता द्या; उच्च न्यायालयात जनहित याचिका

छत्रपती संभाजीनगर : ऊस उत्पादकांना न्याय्य दर मिळावा आणि राज्य सरकारने कायद्यानुसार ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करावे, या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित काळे यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर ३ डिसेंबर २०२६ रोजी सुनावणी अपेक्षित आहे.केंद्र सरकारने २०२६–२७ च्या गाळप हंगामासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) प्रतिटन ३,६५० रुपये जाहीर केला आहे.
तरीही काही साखर कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर जाहीर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम, २०१३ नुसार राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करणे बंधनकारक आहे. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार ७०:३० वाटपाच्या सूत्रावर अंतिम ऊस दर ठरवण्याची जबाबदारी या मंडळाची आहे. मात्र, मंडळ स्थापन न झाल्याने कारखाने स्वतःच दर जाहीर करत असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.
पहिला हप्ता प्रतिटन ४,५०० रुपये देण्याची मागणीसाखरेसोबतच इथेनॉल, बगॅस आणि मळी या उपपदार्थांतूनही कारखान्यांना उत्पन्न मिळते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिटन ४,५०० रुपये द्यावा आणि अंतिम दर ७०:३० सूत्रानुसार निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.






