गाळप परवान्यांसाठी २१२ कारखान्यांचे अर्ज, ७७ कारखान्यांचा हंगाम सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे । शुगरटुडे

ऊस गळीत हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्रातील एकूण २१२ साखर कारखान्यांनी अर्ज केले असून, दीडशेवर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. तर ७७ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमुळे, अनेक ठिकाणी गाळप हंगामामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

शेतकरी संघटनेने जरूर आंदोलन करावे; पण कारखाने बंद पाडण्याची भूमिका घेऊ नये. बघता-बघता नोव्हेंबर आला आहे. हंगाम यशस्वी होण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे प्रशासनाला वाटते.

साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवार अखेरीच्या आकडेवारीप्रमाणे यंदा २१२ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले. त्यात खाजगी १०८ आणि सहकारी १०४ कारखान्यांचा समावेश आहे. मागच्या वर्षीपेक्षा दोन साखर कारखाने यंदा वाढले आहेत.

सुमारे दीडशेवर साखर कारखान्यांना परवाने प्रदान करण्यात आले आहेत; परंतु गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांची संख्या ऐंशीच्या आतच आहे. ताज्या विश्लेषणानुसार, यंदा साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघटनांचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, जय शिवराय संघटना, आंदोलन अंकुश अशा बराच संघटनांनी उसाला पाच हजारांवर प्रति टन दर मिळावा म्हणून विविध ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. त्यांची झळ विशेष करून प. महाराष्ट्रामध्ये बसत आहे. शेतकऱ्यांबरोबरच आणि कारखान्यांचेही नुकसान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

दुष्काळाच्या झळा, त्यात वाढलेले तापमान पाहता आता कारखाने बंद ठेवणे कोणाच्याही हिताचे नाही, एकत्र बसून मध्यममार्ग काढला जाऊ शकतो, असे साखर उद्योगाला वाटते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »