नफा कुणाच्या खिशात? ऊस उत्पादकांना योग्य दर का नाही?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजू शेट्टी यांचा सवाल; साखरेच्या घाऊक-किरकोळ दरांत मोठी तफावत

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून प्रतिकिलो ४७ ते ४८ रुपये दराने विकली जाणारी साखर किरकोळ बाजारात ५८ ते ६६ रुपयांना मिळत आहे. या दरातील फरक नेमका कुणाच्या खिशात जातो आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ का मिळत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

शेट्टी यांनी हातकणंगले येथील एका दुकानाला भेट देऊन साखरेच्या विक्रीदराची माहिती घेतली. त्यानंतर बाजारातील दरांचा दाखला देत त्यांनी साखर कारखानदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कारखानदारांकडून साखरेला योग्य भाव मिळत नसल्याचे आणि उठाव नसल्याचे सांगितले जाते. मात्र, किरकोळ दुकानदारांना साखर प्रतिकिलो ५७ रुपये ५० पैशांना मिळते आणि ते ५८ रुपयांना विकतात. अवघ्या ५० पैशांच्या फरकाने दुकानदार साखर विकत असताना कारखान्यांचा विक्रीदर आणि बाजारभाव यांत मोठी तफावत का आहे, असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला.

एका मोठ्या मॉलमध्ये साखर प्रतिकिलो ६६ रुपयांना, तर किरकोळ दुकानांत ५८ रुपयांना विकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यांच्या निविदांमधील दर आणि बाजारातील प्रत्यक्ष विक्रीदर यांमध्ये किलोमागे सुमारे दहा रुपयांचा फरक कसा निर्माण होतो, याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

ऊस उत्पादकांना पैसे द्यावे लागू नयेत म्हणून साखरेला भाव आणि उठाव नसल्याचे चित्र उभे केले जात आहे का, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांनी ऊस पिकवला नाही, तर कारखाने साखर तयार करू शकणार नाहीत आणि बाजारातही ती उपलब्ध होणार नाही. त्यामुळे साखरेचा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र साखर शंभर रुपये किलो व्हावी, अशी आपली मागणी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळावा, हीच मागणी असल्याचे शेट्टी म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »