मोहनराव शिंदे कारखान्याच्या वजनकाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

सांगली । शुगरटुडे
उसाला योग्य व रास्त दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चाक फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात आंदोलन आणखी तीव्र केले आहे. एरंडोली-आरग परिसरातील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक धडक मारत ऊस तोलणाऱ्या वजन काट्यावरच ठिय्या मांडला.
चार तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा
कारखाना सुरू झाल्याने परिसरात ऊस वाहतुकीची मोठी गर्दी जमली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी काट्यावरच बसकण मारून उसाचा भाव नक्की होईपर्यंत गाळप तात्काळ थांबवण्याची मागणी लावून धरली. या आंदोलनामुळे कारखाना प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. अखेर संघटना आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात तब्बल चार तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर तोडग्याचा मार्ग निघाला.
तोडलेला ऊस आल्यानंतर गाळप पूर्णपणे बंद राहणार
ऊस दर घोषित होत नाही तोपर्यंत गाळप थांबवण्याची अधिकृत हमी कारखान्याने दिली आहे. आधीच तोडणी झालेला ऊस शनिवारी सायंकाळपर्यंत कारखान्यात आणून प्रक्रियेत घेतला जाईल आणि त्यानंतर गाळप पूर्णपणे बंद ठेवले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
‘स्वाभिमानी’चा राज्यभर आंदोलनाचा एल्गार
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत सुरू असलेल्या या आंदोलनात मिरज पूर्व भागातील एरंडोली, आरग, खंडेराजुरी, बेडग, मालगाव आणि भोसे परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.






